कर्जबाजारीपणा : कर्जाच्या विळख्यातून मुक्तीकडे!
एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज! कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर कसे पडाल?

कर्जबाजारीपणा : कर्जाच्या विळख्यातून मुक्तीकडे!
लेख क्रमांक २
एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज! कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर कसे पडाल?
आजचे संकट उद्यावर ढकलताना माणूस नकळत कर्जाच्या अशा जाळ्यात अडकत जातो, जिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे अधिकाधिक कठीण होत जाते.
लेखक : निलेश लोढा

कर्ज घेणे ही काही चुकीची गोष्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी आर्थिक अडचण येऊ शकते. घर, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा इतर गरजांसाठी माणसाला कर्ज घ्यावे लागू शकते. योग्य नियोजन आणि परतफेडीची क्षमता असेल तर कर्ज हे प्रगतीचे साधनही ठरू शकते. परंतु जेव्हा एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते, तेव्हा समजून घ्यायला हवे की आपण एका धोकादायक आर्थिक दुष्टचक्रात प्रवेश करत आहोत.
कर्जबाजारीपणातील ही सर्वांत मोठी आणि गंभीर समस्या आहे.
एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज!
सुरुवातीला एखाद्या व्यक्तीने काही लाखांचे कर्ज घेतलेले असते. ठरलेल्या वेळेत हप्ते भरायचे असतात. परंतु व्यवसायातील मंदी, उत्पन्नात घट, अनावश्यक खर्च, आर्थिक व्यवहारातील नुकसान किंवा चुकीचे आर्थिक निर्णय यांमुळे हप्ते थकू लागतात.
बँकेचे फोन सुरू होतात. खासगी सावकार पैशांची मागणी करू लागतात. मित्र आणि नातेवाईकांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याचा दबाव वाढतो.
अशा वेळी माणूस काय करतो?
एका व्यक्तीचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतो. बँकेचा हप्ता भरण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतो. क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दुसऱ्या क्रेडिट कार्डचा वापर करतो. जुन्या कर्जाचा तगादा थांबवण्यासाठी नवीन कर्जाचा आधार घेतो.
काही काळासाठी परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी वाटते. फोन थांबतात, तगादा कमी होतो आणि मनाला थोडा दिलासा मिळतो.
परंतु प्रत्यक्षात कर्ज कमी झालेले नसते. उलट त्यात नवीन व्याज, नवीन हप्ते आणि नवीन आर्थिक जबाबदाऱ्या जोडलेल्या असतात.
म्हणजेच कर्ज संपत नाही, फक्त त्याचे स्वरूप बदलते.
आजचा दिवस कसातरी ढकलण्याची मानसिकता!
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या माणसाची एक वेगळी मानसिकता तयार होते. त्याला भविष्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा काढायचा, याची चिंता अधिक असते.

आज कोणाचे पैसे द्यायचे आहेत? कोणाचा फोन येणार आहे? कोणाला काय उत्तर द्यायचे आहे? कोणाकडून पैसे उभे करता येतील? आजचा हप्ता कसा भरायचा?
अशा प्रश्नांमध्ये त्याचा संपूर्ण दिवस जातो.
तो विचार करतो, आजची अडचण दूर झाली की पुढचे पाहू. आज हे कर्ज मिटले की थोडा श्वास घेता येईल. आज अमुक व्यक्तीचे पैसे दिले की काही दिवस शांतता मिळेल.
परंतु ही शांतता तात्पुरती असते.
कारण एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज घेतलेले असते. नवीन कर्जाचा हप्ता सुरू झालेला असतो आणि जुन्या कर्जातून सुटका झाली असे वाटत असतानाच नवीन आर्थिक जबाबदारी समोर उभी राहते.
हळूहळू माणूस भविष्याचा विचार करणेच विसरतो. त्याचे संपूर्ण आयुष्य आजचे संकट उद्यावर ढकलण्यात खर्च होऊ लागते.
माझाही या दुष्टचक्रातील अनुभव!
या विषयावर लिहिताना मी स्वतःला या परिस्थितीपासून वेगळे ठेवू शकत नाही.
कारण मी स्वतःही अनेकदा एका कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरे कर्ज घेतले आहे. एका आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या आर्थिक व्यवहाराचा आधार घेतला आहे.
त्या वेळी माझ्या मनात एकच विचार असायचा, आधी हे कर्ज मिटवूया, समोरची अडचण दूर करूया आणि मग पुढचा विचार करूया.

कधी एखाद्याचे पैसे देण्यासाठी दुसरीकडून पैसे उभे केले. कधी एखादे आर्थिक संकट तात्पुरते दूर करण्यासाठी नवीन जबाबदारी स्वीकारली.
त्या क्षणी असे वाटायचे की आपण एक मोठी अडचण दूर केली आहे. पण काही दिवसांनी लक्षात यायचे की अडचण दूर झालेली नाही, तर ती फक्त पुढे ढकलली गेली आहे.
एका कर्जातून बाहेर पडताना दुसऱ्या कर्जाची सुरुवात झालेली असायची.
आज मागे वळून पाहताना जाणवते की, ही केवळ आर्थिक चूक नव्हती, तर ती एक मानसिकताही बनली होती. आजचा दिवस कसातरी निभावून न्यायचा, आजचा तगादा थांबवायचा आणि उद्याचे संकट उद्या पाहू, अशा विचारसरणीत मीही अनेकदा अडकलो.
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या माणसाला त्या क्षणी दूरचा विचार करता येत नाही. त्याला फक्त समोरचा प्रश्न सोडवायचा असतो.
परंतु प्रत्येक वेळी असे करताना आपण स्वतःसाठी आणखी मोठा प्रश्न निर्माण करत असतो, याची जाणीव अनेकदा उशिरा होते.
मी हे अनुभव कोणावर दोषारोप करण्यासाठी किंवा स्वतःचे समर्थन करण्यासाठी सांगत नाही. उलट माझ्या चुका इतरांनी करू नयेत, या प्रामाणिक हेतूने सांगत आहे.
कारण आर्थिक संकटात माणूस कधी कधी पैशांपेक्षा चुकीच्या निर्णयांचा अधिक बळी ठरतो.
कर्जाचे दुष्टचक्र माणसाला आर्थिकच नव्हे, तर मानसिकदृष्ट्याही कमकुवत करते!
कर्ज वाढत जाते तसे त्याचे परिणाम केवळ बँक खात्यावर होत नाहीत. त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर होतो.

१. सततची चिंता आणि मानसिक ताण
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैशांचे विचार डोक्यात सुरू असतात. कोणाला पैसे द्यायचे, कुठून पैसे आणायचे आणि पुढचा हप्ता कसा भरायचा, या विचारांमुळे मानसिक शांतता हरवते.
२. नातेसंबंधांवर परिणाम
मित्र, नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार निर्माण होतात. वेळेवर पैसे देता न आल्यास गैरसमज निर्माण होतात. विश्वासाला तडा जातो आणि अनेकदा जवळची माणसेही दुरावतात.
३. सामाजिक प्रतिष्ठेची भीती
समाजात आपल्याबद्दल काय बोलले जाईल? लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतील? या भीतीमुळे माणूस आपली खरी आर्थिक परिस्थिती लपवू लागतो.
४. चुकीचे आर्थिक निर्णय
लवकर पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस अधिक जोखीम घेतो. काही जण अविचाराने ट्रेडिंग करतात, काही जण जास्त व्याजाने पैसे घेतात, तर काही जण पुन्हा नवीन व्यवसाय किंवा व्यवहारातून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात.
यातून संकट कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते.
५. आत्मविश्वास कमी होणे
एकेकाळी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असलेला माणूस स्वतःच्याच निर्णयांबद्दल साशंक होऊ लागतो. प्रत्येक फोनची भीती वाटू लागते. स्वतःच्या कुटुंबासमोरही अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
म्हणूनच कर्जाचे दुष्टचक्र हे केवळ पैशांचे गणित नसून ते माणसाच्या मानसिक आणि सामाजिक आयुष्यालाही हादरवून टाकणारे संकट आहे.
मग या दुष्टचक्रातून बाहेर कसे पडायचे?
कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी केवळ पैसे मिळवणे पुरेसे नसते. त्यासाठी सर्वप्रथम आर्थिक परिस्थितीचा प्रामाणिक स्वीकार आणि योग्य नियोजन आवश्यक असते.
१. नवीन कर्ज घेण्याची सवय थांबवा.
जुने कर्ज फेडण्यासाठी वारंवार नवीन कर्ज घेणे थांबवणे आवश्यक आहे. कोणतेही नवीन कर्ज घेण्यापूर्वी त्याचा व्याजदर, परतफेडीची क्षमता आणि एकूण खर्च तपासा. योग्य पुनर्रचना किंवा कमी व्याजाचा पर्याय उपलब्ध असल्यास तज्ज्ञांच्या मदतीने निर्णय घ्या.
२. आपल्या सर्व कर्जांची यादी तयार करा.
कोणाकडून किती पैसे घेतले आहेत, किती व्याज आहे, किती हप्ता आहे, किती थकबाकी आहे आणि परतफेडीची तारीख काय आहे, याची संपूर्ण माहिती एका ठिकाणी लिहून ठेवा.
वास्तव समोर आले की नियोजन करणे सोपे होते.
३. उत्पन्न आणि खर्चाचे गणित समजून घ्या.
आपले मासिक उत्पन्न किती आहे आणि अनावश्यक खर्च किती आहेत, याचा आढावा घ्या. काही काळ अनावश्यक खर्च पूर्णपणे कमी करा. उपलब्ध पैशांचे नियोजन करा.
४. कर्जदारांशी प्रामाणिक संवाद साधा.
पैसे देण्यास विलंब होत असल्यास परिस्थिती लपवण्यापेक्षा संबंधित व्यक्तीशी स्पष्टपणे बोला. शक्य असलेली परतफेड आणि कालावधी याबाबत वास्तववादी आश्वासन द्या. पूर्ण करता येणार नाही अशी आश्वासने देऊ नका.
५. कर्जफेडीला प्राधान्य द्या.
सर्व कर्जांचे व्याजदर, थकबाकी आणि परतफेडीच्या अटी तपासा. जास्त व्याजाच्या कर्जाला प्राधान्य देण्याची पद्धत किंवा लहान कर्ज आधी मिटवण्याची पद्धत यापैकी आपल्या परिस्थितीला योग्य पर्याय निवडा. मात्र घरखर्च, आवश्यक गरजा आणि आपत्कालीन तरतूद यांचाही विचार करा.
६. झटपट पैसा कमावण्याच्या मोहापासून दूर राहा.
कर्ज फेडण्यासाठी अवास्तव नफा मिळवण्याच्या अपेक्षेने शेअर बाजार, ऑप्शन ट्रेडिंग किंवा इतर जोखमीच्या व्यवहारांमध्ये अधिक पैसे गुंतवणे टाळा. आर्थिक संकटात असताना भांडवल सुरक्षित ठेवणे आणि नियमित उत्पन्न टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.

कर्जमुक्तीची सुरुवात एका निर्णयापासून होते!
कर्जातून बाहेर पडण्याचा प्रवास एका दिवसात पूर्ण होत नाही. त्यासाठी वेळ लागतो, संयम लागतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या चुका स्वीकारण्याची हिंमत लागते.
आपण किती कर्ज घेतले आहे, कोणाकडून घेतले आहे आणि ते कसे फेडायचे आहे, याचा स्पष्ट आराखडा तयार केला पाहिजे.
कर्जबाजारी असणे म्हणजे आयुष्य संपले असे नाही. आर्थिक संकट आले म्हणजे माणूस अपयशी ठरला असेही नाही. मात्र त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी चुकीच्या सवयी आणि चुकीची निर्णयप्रक्रिया बदलणे गरजेचे आहे.
माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे. एक कर्ज मिटले म्हणून आपण कर्जमुक्त झालो असे समजू नये. जोपर्यंत आपले उत्पन्न, खर्च, कर्ज आणि आर्थिक नियोजन यांचा समतोल साधला जात नाही, तोपर्यंत कर्जाचे संकट पुन्हा निर्माण होऊ शकते.
आज आपल्याला कोणाचे पैसे द्यायचे आहेत, यापेक्षा उद्यापासून पुन्हा कर्ज घ्यावे लागू नये, यासाठी काय करायचे आहे, हा विचार अधिक महत्त्वाचा आहे.
शेवटी एवढेच सांगावेसे वाटते…
कर्ज घेणे कधी कधी अपरिहार्य असू शकते; परंतु कर्ज फेडण्यासाठी सतत दुसरे कर्ज घेणे ही धोक्याची घंटा आहे.
आजचा दिवस कसातरी ढकलण्यापेक्षा उद्याचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी आजच योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
कारण कर्जमुक्त होण्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीपासून पळणे बंद करणे आणि तिचा प्रामाणिकपणे सामना करणे.
कर्जाचा डोंगर कितीही मोठा असला तरी योग्य नियोजन, आर्थिक शिस्त, संयम आणि सातत्य यांच्या जोरावर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच शोधता येतो.

पुढील लेखात… माझा वैयक्तिक अनुभव!
कर्जाच्या या दुष्टचक्राबद्दल लिहिताना मी केवळ पुस्तकी माहिती किंवा इतरांचे अनुभव मांडत नाहीये. कारण या परिस्थितीचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची वेळ माझ्यावरही अनेकदा आली आहे. कर्जाच्या विळख्यात अडकताना कोणत्या चुका झाल्या, त्याचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय झाले आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मी काय प्रयत्न करत आहे, याचा प्रवास मी स्वतः अनुभवला आहे आणि आजही त्या संघर्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुढील लेखामध्ये मी माझा हा वैयक्तिक अनुभव वाचकांसमोर अगदी स्पष्टपणे मांडणार आहे.
कर्ज झाल्यानंतर माणसाच्या आयुष्यात नेमके काय बदल घडतात? माणसाची मानसिकता कशी बदलते? नाती, मैत्री, सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास यांच्यावर काय परिणाम होतो? आर्थिक संकटात माणूस कोणत्या चुका करतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कसा करतो?
हे सर्व मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगणार आहे.
कारण मला वाटते, माझ्या चुका आणि संघर्षातून एखाद्या व्यक्तीला वेळीच सावध होता आले किंवा एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीला पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा मिळाली, तर माझ्या या लेखनाचे खरे सार्थक होईल.
म्हणून पुढील लेख अवश्य वाचा. कदाचित तो माझा अनुभव असेल, पण त्यात तुम्हाला तुमचीच कहाणी दिसेल!
— निलेश लोढा



