कोट्यवधींच्या शेअर मार्केट फसवणुकीतील आणखी दोन आरोपींना करमाळा पोलिसांच्या जाळ्यात
कोट्यवधींच्या शेअर मार्केट फसवणुकीतील आणखी दोन आरोपींना करमाळा पोलिसांच्या जाळ्यात
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ७/ सध्या जगभरात शेअर मार्केटच्या माध्यमातून करोडो रुपये कमविण्याच्या दृष्टिकोनातून, मोठ्या प्रमाणात विशिष्ट रक्कम गुंतविली जाते. परंतु शेअर मार्केट म्हणजे काय? हेच बर्याच अंशी लोकांना माहित नसल्याचे पहायला मिळते. व याच संधीचा फायदा घेत शेअर मार्केटच्या माध्यमातून दलाली करुन, सर्वसामान्याना ठगविण्याचा धंदाच अनेकांनी सुरु केला असल्याचे पहायला मिळत आहे. असेच एक प्रकरण करमाळा तालुक्यामध्ये काही महिन्यांपूर्वी घडल्याचे दिसुन आले. शेयर मार्केटमध्ये पैसे लावून नफा कमावून देण्याचे आमिष दाखवून, लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्यांपैकी आणखी दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केलेली असून, यापूर्वीच एक आरोपी अटकेत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे घोटी ता. करमाळा येथील रेवणनाथ लक्ष्मण ननवरे याने मौजे घोटी, केम, तसेच पुणे, बेंगलोर येथील लोकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन, त्यांना पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे फिर्यादी बाळासाहेब पोपट राऊत यांनी करमाळा पोलीस स्टेशनला 19 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल केला होता. सदरील आरोपी टेंभुर्णी येथे गाडी लावून फरार झाला होता. सदरच्या प्रकरणातील रेवणनाथ लक्ष्मण ननवरे या आरोपीस पूर्वीच अटक झालेली असून, त्याचे इतर दोन साथीदार किशोर दिलीप ननवरे (३७) व धनाजी बापू ननवरे (४३) दोघे ही रा. घोटी ता. करमाळा यांना पोलिसांनी अटक केलेली असून, त्यांना न्यायालयाने दि ७/१२/२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.