चीनमधील बुद्धिबळ खेळणारा रोबोट प्रथमच अहिल्यानगरमध्ये; आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे ११ नोव्हेंबरपासून आयोजन

चीनमधील बुद्धिबळ खेळणारा रोबोट प्रथमच अहिल्यानगरमध्ये; आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे ११ नोव्हेंबरपासून आयोजन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
अ. नगर: दि. ३१/ बुद्धिबळ प्रेमींसाठी आकर्षण ठरणारी शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, एस. टी. स्टँड रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चीनमधून प्रथमच अहिल्यानगरमध्ये बुद्धिबळ खेळणारा अत्याधुनिक रोबोट येणार असून, हा रोबोट प्रत्यक्ष खेळाडूंशी बुद्धिबळाचा डाव खेळणार आहे. त्यामुळे बुद्धिबळ प्रेमींसह नागरिकांनाही ही अनोखी संधी अनुभवता येणार आहे.
या स्पर्धेची माहिती अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून खेळाडू सहभागी होणार असून, गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांतील दोनशेहून अधिक खेळाडूंनी आतापर्यंत आपला प्रवेश निश्चित केला आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.
या स्पर्धेचे विशेष आकर्षण असलेला चीनमधून येणारा बुद्धिबळ यंत्रमानव खेळाडूंशी प्रत्यक्ष बुद्धिबळ खेळणार आहे. नगरमधील तसेच बाहेरगावच्या खेळाडूंना या रोबोटसोबत डाव खेळण्याची संधी मिळणार असून, बुद्धिबळ खेळाडू, पालक आणि प्रशिक्षकांसाठीही हा अनुभव विशेष ठरणार आहे, अशी माहिती संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी दिली. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वयोगटातील मोठी विविधता. अवघ्या साडेचार वर्षांचा बाल खेळाडू ते ८७ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू अशा विविध वयोगटांतील बुद्धिबळपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, त्यानंतर स्पर्धेतील सामने सुरू होतील. स्पर्धेत एकूण नऊ फेऱ्या होणार आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील विविध गटांमध्ये एकूण पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके, आकर्षक ७० करंडक तसेच सहभागी सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० लाकडी बुद्धिबळ पट आणि सोंगट्यांचा वापर हेही या स्पर्धेचे वैशिष्ट्य राहणार आहे. अशा प्रकारचे १०० आंतरराष्ट्रीय दर्जाचे लाकडी बुद्धिबळ पट भारतात केवळ अहिल्यानगर येथेच वापरले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे (जळगाव) काम पाहणार असून, पवन राठी (पुणे), शार्दुल टापसे (सातारा), दीपक चव्हाण (वाशिम), शिशिर इंदुरकर (नागपूर), प्रशांत धंगेकर आणि देवेंद्र ढोकळे (अहिल्यानगर) हे सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नियमावलीनुसार पार पडणार आहे. तसेच शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनने या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, मनीष जसवानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, सचिन कांबळे (पाथर्डी), शिवा काळे (श्रीरामपूर), कु. दुर्गा ढोकळे (शेवगाव), संकेत गाडे (कोपरगाव), संजय खडके, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, अतुल कोठारी, सौ. शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ आणि सौ. रोहिणी आडकर आदी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील बुद्धिबळप्रेमी, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.
यशवंत बापट:- ९३२६०९२५०१
परूनाथ ढोकळे:-९८५०७०४२६८


