पवार जनरल हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी

पवार जनरल हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ आरोग्यसेवा ही समाजसेवेचा महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे. याच सामाजिक बांधिलकीतून पवार जनरल हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिराला करमाळा शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ऑर्थोपेडिक तपासणीसाठी २५० रुग्ण, दंत तपासणीसाठी ४५ रुग्ण, तर विविध आरोग्यविषयक तक्रारींसाठी सुमारे ४५ ते ५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक तपासणी आणि पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शिबिरामध्ये प्रामुख्याने हाडे व सांधे, दात तसेच विविध आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. विशेषतः हाडांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने ऑर्थोपेडिक तपासणीचा लाभ घेतला. आजारांचे वेळीच निदान करून योग्य उपचार घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबतही या शिबिरातून जनजागृती झाली.
या आरोग्य शिबिराला करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. लोकरे नागनाथ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. अविनाश घोलप, डॉ. अनुप खोसे, डॉ. रोहन पाटील, डॉ. प्रमोद शिंदे आणि डॉ. पोपट नेटके यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले. तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती आणि रुग्णांना मिळालेले थेट मार्गदर्शन हे शिबिराचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
पवार जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून करमाळा व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. अविनाश राऊत आणि डॉ. श्वेता राऊत हे पवार जनरल हॉस्पिटलमध्ये कायम उपलब्ध राहून सेवा देणार आहेत. त्यामुळे हाडे व सांध्यांच्या विविध आजारांवर तज्ज्ञ मार्गदर्शन, तपासणी आणि उपचाराची सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. करमाळा तालुका तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना हाडांच्या उपचारासाठी सोलापूर, पुणे किंवा अन्य मोठ्या शहरांकडे जावे लागते. मात्र, तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांची कायमस्वरूपी सेवा आणि हॉस्पिटलमधील आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विश्वजीत यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच डॉ. अविनाश राऊत आणि डॉ. श्वेता राऊत यांच्या योगदानाबद्दलही विशेष आभार व्यक्त करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनासोबतच हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी रुग्णांची नोंदणी, तपासणी व्यवस्था, मार्गदर्शन आणि गर्दीचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले. शिबिराच्या यशामध्ये अक्षय, राजश्री, रेश्मा, ऋतुजा, सुभेदार, विठ्ठल, आदित्य गायकवाड, प्रणिती, अमन, सार्थक, राहुल, योगेश, पूनम आणि साजिद यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा राहिला. याशिवाय वैभव काका, डॉ. पोल आणि आकाश यांच्या विशेष योगदानाचेही कौतुक करण्यात आले. प्रत्येकाने आपापली जबाबदारी सेवाभावाने पार पाडल्यामुळे शिबिर सुरळीतपणे पार पडले आहे.
पवार जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉ. रविकिरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. हॉस्पिटलमध्ये ३० बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अनुभवी वैद्यकीय स्टाफ, सीटी स्कॅन, अत्याधुनिक लॅबोरेटरी आणि एक्स-रे सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना आवश्यक तपासण्या आणि उपचार स्थानिक पातळीवरच मिळण्यास मदत होत आहे. तसेच पवार हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यास अडचण येणाऱ्या रुग्णांना यामुळे आधार मिळत आहे.
या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नागरिकांचा पवार जनरल हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवांवरील विश्वास दर्शविणारा ठरला. भविष्यातही अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


