Breaking
ब्रेकिंग

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे वाढीव आवर्तन सुरू करा:- मा. आ. संजयमामा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन

0 8 9 6 7 5

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे वाढीव आवर्तन सुरू करण्यासंदर्भात माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पुढाकार

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन नुकतेच 15 ऑक्टोबर रोजी बंद झाले. ‌नियोजन शून्य कारभार व खुनशी राजकीय प्रवृत्तीमुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील 24 गावांपैकी 8 गावे पूर्णपणे या आवर्तनापासून वंचित राहिली तसेच, ज्या गावांना पाणी मिळालेले आहे त्या गावातीलही सर्व पाणीपुरवठ्यांच्या ठिकाणी पाणी गेलेले नाही. आकस बुद्धीने अनेक गावांचा पाण्यावरचा अधिकार नाकारला आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष असून त्याचा उद्रेक आता आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलेला आहे. वेगवेगळ्या गावातील कार्यकर्ते निवेदन देऊन योजना सुरू करण्यासंदर्भात भूमिका मांडू लागलेले आहेत‌.

याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आता दहिगाव योजना सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला असून यासंदर्भात त्यांनी लेखी निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेले आहे. सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये एकूण 24 गावांचा समावेश असून 10500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. 15 ऑक्टोबर 2026 रोजी खरीप आवर्तन पूर्ण झाल्यानंतर सदर योजना बंद करण्यात आलेली आहे, परंतु या योजनेच्या लाभक्षेत्रातील जवळपास 8 गावे ही खरीप आवर्तनातील सिंचनापासून वंचित आहेत. सदर गावांना रब्बी आवर्तनाचे पाणी मिळाल्यास विविध गावातील पाणीपुरवठा योजनांचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल.

शेलगाव क, पांडे, मसेवाडी, हिसरे, फिसरे, सालसे, आळसुंदे, घोटी, साडे, झरे, निंभोरे इत्यादी गावांचा पाणीपुरवठ्याचा विषय सध्या गंभीर आहे. सदर गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षेत्रात दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी जात असल्यामुळे या गावांचा पाणी पुरवठ्याचा विषय मार्गी लागेल. तरी विशेष बाब म्हणून आपण रब्बी आवर्तन सुरू करण्याची परवानगी द्यावी. माढा तालुक्यामध्ये सीना माढा उपसा सिंचन योजना 210 क्यूसेकने सध्या सुरू आहे. दहिगाव उपसा सिंचन योजना ही 110 क्युसेकने पाणी उचलते. त्यामुळे सदर योजना सुरू करण्यासाठी आपण परवानगी द्यावी ही विनंती. या आशयाचे निवेदन माजी आमदार शिंदे यांनी दिले आहे.

सदर निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, निंभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री. दादासाहेब पाटील, श्री किशोर पाटील, श्री बाळासाहेब घाडगे, श्री मनोज गरड, श्री सुरज बोराटे आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक श्री. संजय आंबोले यांनी दिले.

जिल्हाधिकारी सकारात्मक:- सरपंच रवींद्र वळेकर.

जनावरांच्या चाऱ्याचा, माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आंम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना सांगितला. त्याचबरोबर शेजारील माढा तालुक्यामध्ये योजना सुरू आहे, नदीपात्रातही पाणी सोडण्याचे नियोजन सुरू असल्याचे समजते. या तुलनेत दहिगाव ही तर अतिशय छोटी योजना असून योजनेला मंजूर असलेल्या एकूण पाण्यापैकी 50 टक्के पाणी सुद्धा या योजनेतून उचलले जात नाही ही बाब जिल्हाधिकारी साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी खरीप आवर्तन विस्तारित स्वरूपात देण्यासाठी सकारात्मक असून या संदर्भात लवकरच निर्णय घेतील असा आशावाद सरपंच रवींद्र वळेकर यांनी व्यक्त केला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे