झाडी येथे अनोखा व पहिलावहिला संक्रांत भेट-कुटुंब स्नेहमेळावा संपन्न
झाडी येथे अनोखा व पहिलावहिला संक्रांत भेट-कुटुंब स्नेहमेळावा संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
झाडी :- आज दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी झाडी येथे एक अनोखा व पहिलावहिला संक्रांत भेट व कुटुंबस्नेहमेळाव्यानिमित्त हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रा डॉ विलास पाटील व सौ डॉ उज्वला पाटील यांनी आयोजन केले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन एक विधवा, एक कुमारी व एक सुवासिनी यांच्या हस्ते करून जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली. जिजाऊ वंदना व मार्गदर्शनपर व्याख्यान जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्यकारणी सदस्य सौ वसुंधराताई लांडगे यांनी सादर केले. त्यांनी सामाजिक प्रबोधन करत स्वानुभव कथन केले.तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती दर्शनाताई पवार यांनी महिलांशी समाज परिवर्तन पर काही हितगुजगोष्टी-गप्पा केल्या. त्यातून महिलांच्या सार्वजनिक आरोग्याच्या, शिक्षणाच्या अधिकाराच्या महती सांगून स्त्री ही शक्ती असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविक रूपाने प्राध्यापक विलास पाटील यांनी विशद केली. आपल्या गावचा विकास आपण महिलांनीच पुढे होऊन करावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गावातील ज्येष्ठ नेते सुभाष आबा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे अनोखे पण म्हणजे कार्यक्रमाच्या प्रारंभी एकल अर्थात विधवांचा प्रातिनिधीक सन्मान करून भेटवस्तू दिली. तर सुवासिनींचा म्हणून गावातील प्रत्येक जाती समूहातील एक प्रतिनिधी होईल असे भिल्ल, मांग,चांभार,राजपूत, कुणबी पाटील असे प्रतिनिधी महिलांना भेटवस्तू देऊन हळदीकुंकू केले.
या निमित्ताने गावात सामाजिक सलोखा व स्त्रीत्व,स्त्रीभान टिकून राहावे व यंदापासून हा कार्यक्रम आपण सामाजिक प्रथा म्हणून दरवर्षी साजरा करूया असा संकल्प जमलेल्या सर्व माता भगिनींनी व्यक्त केला. यानिमित्ताने सामाजिक परिवर्तनाकडे एक वेगळं पाहून आम्ही झाडीतल्या महिलांनी टाकले अशा काही महिलांनी प्रतिक्रिया दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला वर्गाने पुढाकार घेतला.