टँकर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू, एक बचावला
टँकर पलटी झाल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू, एक बचावला
विशेष प्रतिनिधी : रफिक शेख
ऑक्सिजनची वाहतूक करणारा टँकर रस्ता दुभाजकाला धडकून महामार्गावरच उलटल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण सुदैवाने बचावला आहे. नगर – पुणे महामार्गावर चास घाटातील उतारावर गुरुवारी (दि.२८) दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात मारुती रामभाऊ कदम (वय ६५) हे मयत झाले असून संदीप बाबाजी अडसरे (दोन्ही रा. पिंप्री जलसेन, ता.पारनेर) हे या अपघातातून सुदैवाने बचावले असून ते जखमी झाले आहेत. मयत कदम व अडसरे हे दोघे चास घाटात कांद्याचे रोप पाहण्यासाठी गेले होते. रोप पाहून ते महामार्गाच्या कडेने आपल्या दुचाकी लावलेल्या ठिकाणी पायी जात असताना त्याच वेळी ऑक्सिजनची वाहतूक करणारा टँकर पुण्याहून नगरच्या दिशेने येत होता.
घाटात उताराला चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले, त्यामुळे टँकर रस्ता दुभाजकाला धडकून महामार्गावरच पलटी झाला आणि घसरत घसरत हे दोघे पायी चाललेले होते तिथ पर्यंत अचानक आला. त्या टँकर खाली सापडून कदम हे मयत झाले तर अडसरे हे रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडल्याने ते बचावले गेले.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, पो.हे.कॉ.आबासाहेब झावरे, खंडेराव शिंदे यांच्या सह महामार्ग वाहतूक शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावून जखमी व मयत यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. क्रेन बोलावून रस्त्यावर पलटी झालेला टँकर बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.