Breaking
ब्रेकिंग

शेलगाव येथे स्व. महादेव पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे अनावरण व २४ भाऊ आणि २३ बहिणींचा भाऊबीज सोहळा उत्साहात साजरा; नाती जपा, माणसे जपा हीच जीवनाची खरी श्रीमंती:- प्रा. डॉ. गणेश शिंदे

0 9 0 4 1 1

शेलगाव येथे स्व. महादेव पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे अनावरण व २४ भाऊ आणि २३ बहिणींचा भाऊबीज सोहळा उत्साहात साजरा; नाती जपा, माणसे जपा हीच जीवनाची खरी श्रीमंती:- प्रा. डॉ. गणेश शिंदे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १५/ माणसाने आयुष्यात किती संपत्ती कमावली, यापेक्षा किती माणसे जोडली आणि किती नाती जपली, हे अधिक महत्त्वाचे आहे. नाती जपा, माणसे जपा, कारण माणसाच्या पश्चात त्याची संपत्ती नव्हे, तर त्याने जोडलेली माणसे आणि केलेले कार्यच त्याची खरी ओळख ठरते. माणसाचे मोठेपण त्याच्या पदात, प्रतिष्ठेत किंवा संपत्तीत नसून त्याने समाजासाठी केलेल्या कार्यात आणि माणसांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानात असते, असे भावस्पर्शी प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते डॉ. गणेश शिंदे यांनी केले.

शेलगाव (क.), ता. करमाळा येथे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते व पोलीस पाटील स्व. महादेव भगवान पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेलगाव–गुळसडी रस्त्यावरील पाटील फार्म येथे स्व. महादेव पाटील यांच्या स्मृतिस्थळाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, आजच्या बदलत्या जीवनशैलीत माणसे जवळ असूनही मनाने दूर जात आहेत. एकत्र कुटुंबपद्धती, परस्परांवरील विश्वास, ज्येष्ठांचा आदर आणि लहानांवरील प्रेम ही आपली खरी सांस्कृतिक संपत्ती आहे. कुटुंबातील मतभेद विसरून एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, हीच नाती टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे. पुढच्या पिढीला केवळ संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा संस्कारांचा, एकजुटीचा आणि माणुसकीचा वारसा देणे अधिक महत्त्वाचे आहे.

स्व. महादेव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि कुटुंबातील नात्यांचे बंध अधिक दृढ करण्यासाठी पाटील परिवाराने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. स्मृतिस्थळ उभारणे म्हणजे केवळ आठवणी जपणे नव्हे, तर त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे होय, असेही त्यांनी नमूद केले.

व्यासपीठावर यशवंत परिवाराचे प्रमुख विलासराव घुमरे, ग्लोबल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. रविकिरण पवार, मुळशी तालुक्याचे माजी सभापती अण्णा खानेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विलास घुमरे यांनी पाटील कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. कुटुंबातील नातेसंबंध आणि एकजूट जपण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. विलास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे २४ भाऊ आणि २३ बहिणींचा भाऊबीज सोहळा उत्साहात पार पडला. कुटुंबातील स्नेह, जिव्हाळा आणि नात्यांमधील आपुलकीचे दर्शन या सोहळ्यातून घडले. जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या कुटुंबीयांनी जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांतील प्रेम आणि बंधुभाव अधिक दृढ केला. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे