स्व. गंगूआई रामजी सोळंके सुवर्णपदक कु. पल्लवी संपतराव पाटील यांना जाहीर
स्व. गंगूआई रामजी सोळंके सुवर्णपदक कु. पल्लवी संपतराव पाटील यांना जाहीर

राहुरी तालुका जावेद शेख
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ३९ व्या पदवी प्रदान समारंभात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणारे *“स्व. गंगूआई रामजी सोळंके सुवर्णपदक”* कु. पल्लवी संपतराव पाटील (कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे *१५ मार्च २०२६* रोजी आयोजित पदवी प्रदान समारंभात *महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. जिष्णू देव वर्मा* यांच्या हस्ते हे मानाचे सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे सहकुलपती श्री. दत्तात्रय भरणे तसेच ICAR-IARI, नवी दिल्ली येथील माजी संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. सिंह* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे सुवर्णपदक *चिमणापूर (ता. कन्नड, जि. संभाजीनगर) येथील स्व. गंगूआई रामजी सोळंके* यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले असून कृषीविद्या विभागातील *“तण नियंत्रण (Weed Management)”* या विषयात विद्यापीठ स्तरावर सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी प्रदान करण्यात येते.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. (कृषी) शिक्षण घेत असताना कु. पल्लवी संपतराव पाटील यांनी *AGRON-503 : Principles and Practices of Weed Management* या विषयात सर्वाधिक गुण मिळवत *८.६ सीजीपीए* सह उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांना हे सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.
*स्व. गंगूआई रामजी सोळंके* या चिमणापूर येथील कष्टकरी, जिद्दी व कुटुंबवत्सल महिला होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या कुटुंबाला संस्कार व शिक्षणाची प्रेरणा दिली. त्यांच्या स्मरणार्थ हे सुवर्णपदक सुरू करण्यात आले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहे.
विशेष म्हणजे कु. पल्लवी पाटील यांनी *महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेत राज्यात ८ वा क्रमांक मिळवत कृषी उपसंचालक (Class-I)* पदासाठी निवड मिळवली आहे. त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कु. पल्लवी पाटील यांच्या यशामागे त्यांचे वडील संपतराव पाटील, आई विद्या पाटील व भाऊ श्रेयस यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल *स्व. गंगूआई रामजी सोळंके परिवार तसेच डॉ. आनंद विठ्ठलराव सोळंके* यांच्या वतीने कु. पल्लवी संपतराव पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.


