श्रीरामपूर शहरात नकली दुधाचा उदछांक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित प्रशासन लक्ष देणार का? – रियाजखान पठाण

श्रीरामपूर शहरात नकली दुधाचा उदछांक, नागरिकांचे आरोग्य धोक्यात : संबंधित प्रशासन लक्ष देणार का? – रियाजखान पठाण
राहुरी तालुका जावेद शेख
श्रीरामपूर शहर आणि परिसरात सध्या केमिकलयुक्त नकली दुधाच्या विक्रीचा गंभीर प्रकार वाढत असल्याची धक्कादायक चर्चा सर्वत्र सुरू असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुधाळ जनावरांची संख्या मर्यादित असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर दुधाची विक्री होत असल्याने अनेक ठिकाणी रासायनिक पदार्थांपासून तयार केलेले बनावट दूध विकले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कथित नकली दुधामुळे लहान निरागस बालके, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. दूध हा रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यामध्ये भेसळ होत असल्यास त्याचे परिणाम थेट जनतेच्या आरोग्यावर होतात. पोटाचे विकार, अन्न विषबाधा, किडनी आणि यकृताशी संबंधित आजार तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, अन्न व औषध प्रशासन,नगर पालिका तसेच पोलीस विभागाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बनावट दूध तयार करणारे आणि त्याची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
तसेच शहरातील विविध दूध डेअऱ्या, थंडगृह, दूध संकलन केंद्रे आणि विक्रेत्यांची अचानक तपासणी करून दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.
सामान्य नागरिकांनीही दूध खरेदी करताना सतर्क राहण्याची गरज असून संशयास्पद दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आढळल्यास संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन सामाजिक स्तरावरून करण्यात येत आहे.शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक संस्था,संघटना पदाधिकार्यांनी पुढे येत याबाबी योग्य पाठपुरावा करणे देखील क्रमप्राप्त ठरत आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्यामुळे प्रशासनाने देखील वेळ न दवडता ठोस कारवाई करणे ही काळाची गरज बनली आहे.


