करमाळा येथे रिपब्लिकन पक्षाची नुतन कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सज्ज:- राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणे

करमाळा येथे रिपब्लिकन पक्षाची नुतन कार्यकारणी व कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न; सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्यास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सज्ज:- राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणे
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ “सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत महाराष्ट्रातील गोरगरीब व सर्वसामान्यांना वाली उरलेला नाही. अशा काळात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष राज्यभरात जनतेच्या न्याय-हक्कांच्या चळवळीत सातत्याने सक्रिय राहिला असून, यापुढेही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास पक्ष पूर्ण ताकदीने सज्ज आहे,” असे रोखठोक प्रतिपादन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केले. करमाळा येथे आयोजित महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा व नूतन कार्यकारिणी निवड बैठकीप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या बैठकीत यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
उजनी प्रकल्पांवरून सरकारवर निशाणा साधत संजय सोनवणे यांनी उजनी परिसरातील प्रकल्पांवरून आक्रमक भूमिका घेतली. “उजनी येथील प्रस्तावित ‘एआय (AI) डेटा सेंटर’ व इतर तीन विनाशकारी प्रकल्पांना पक्षाचा ठाम विरोध आहे. या प्रकल्पांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात पहिले आंदोलन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानेच छेडले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, स्थानिक युवकांच्या भवितव्यावर भर देत, “भांडवलदारांचे प्रकल्प लादण्यापेक्षा स्थानिक युवकांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देणे आणि त्यांच्याकडून विधायक समाजकार्य घडवून आणणे यालाच पक्षाचे नेहमी सर्वोच्च प्राधान्य राहील,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पक्षाची जंबो कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात आली. या मेळाव्यास पक्षाचे पदाधिकारी, नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यशपाल कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
“यशपाल कांबळे हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय नेतृत्व आहेत. ते सर्वसामान्य जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारे कार्यकर्ते असून, लोकांच्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यात तसेच नागरिकांच्या सुख-दुःखात नेहमी अग्रभागी असतात. त्यांचे हे सर्वसमावेशक नेतृत्व सर्वमान्य होत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या ‘पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची’ महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून तरुणांना संघटित करून जनआंदोलने अधिक तीव्र केली जातील.
संजय सोनवणे:- राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष.


