आई राजा उदो…उदो….बोल कमलाभवनी माते की जय च्या जयघोषात श्रीकमलाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना !


आई राजा उदो…उदो….बोल कमलाभवनी
माते की जय च्या जयघोषात श्रीकमलाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना !

करमाळा / विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी
आई राजा उदे…उदे….बोल कमलाभवनी माते की जय च्या जयघोषात श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्रारंभ करून विधीवत घटस्थापना करण्यात आली यावेळी श्रीकमलादेवीची आरती संपन्न झाली
करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिर संस्थानचे विश्वस्त ॲड. शिरिषकुमार लोणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. घटस्थापनेनंतर सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या गजरात देवीची आरती संपन्न झाली.नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक विधींची जय्यत तयारी करण्यात आली होती. माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून, या सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. मंदिर संस्थानचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी देवीची विधिवत पूजा मांडली. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो!’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या मंगलमय धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पुरोहित रविराज पुराणिक, सुशील पुराणिक, मंदिराचे पुजारी बापूराव पुजारी, विजय पुजारी, संदीप पुजारी(सर), जयदीप पुजारी, भारत सोरटे ,नारायण सोरटे,अभिमान सोरटे, रामलिंग सोरटे यांच्यासह मंदिरातील सर्व मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.
शारदीय नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा, श्रद्धेचा आणि मांगल्याचा उत्सव मानला जातो. या नऊ दिवसांत श्रीकमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.
…चौकट….
नवरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर व परिसरात महास्वच्छता अभियान राजेरावरंभा मित्र मंडळ व देवराई ग्रुपच्या वतिने राबविण्यात आले होते ,त्यास भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
नवरात्रोत्सवानिमित्त संपुर्ण मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून,मंदिरापासून ते छत्रपती शिवाजीमहाराज चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात करमाळा शहराच्या आसपास कोणत्याही प्रकारचे मांसाहार विक्री अगर हाॅटेलमध्ये मांसाहार जेवण स्वयंसर्तीने बंद असते.

नवरात्र उत्सवात भाविक भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी मंदिर समिती,ग्रामपंचायत,तेथील ग्रामस्थ हे योग्य दक्षता घेत असून,उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी करमाळा शहरापासून मंदिरापर्यन्त व मंदिराच्या चोहो बाजुंनी पोलीस व होमगार्ड यांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.


