केडगाव येथील इंदिरानगर परिसरात अनैतिक प्रकार; त्रस्त रहिवाशांचे प्रशासनाला निवेदन
केडगाव येथील इंदिरानगर परिसरात अनैतिक प्रकार; त्रस्त रहिवाशांचे प्रशासनाला निवेदन
अहिल्यानगर: : केडगाव (नगर-दौंड रोड) येथील इंदिरानगर परिसरात संशयास्पद व अनैतिक प्रकार वाढल्यामुळे त्रस्त रहिवाशांनी कोतवाली पोलीस, पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिकेला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
परिसरातील घरमालक राजू विष्णू जाधव व जालिंदर राजू जाधव यांच्या खोल्यांमध्ये कोणत्याही कौटुंबिक पार्श्वभूमीशिवाय अनोळखी महिला व पुरुषांची दिवस-रात्र संशयास्पद ये-जा सुरू असते. पैशांच्या हव्यासापोटी घरमालकांनी या भाडेकरूंचे ‘पोलीस व्हेरिफिकेशन’ देखील केलेले नाही. या जागेचा वापर अनैतिक व व्यावसायिक स्वरूपाच्या शारीरिक संबंधांसाठी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे परिसराची बदनामी होत असून महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ प्रत्यक्ष चौकशी करून संबंधित घरमालकांवर व संशयास्पद व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून, या निवेदनावर गोरख जाधव, उमेश गायमुखे, दौलत पाटोळे, अमोल मिरपगार, शाम कांबळे आदींसह स्थानिक भागातील नागरिकांच्या सह्या आहेत.


