आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्याची शिवीगाळ

*आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्याची शिवीगाळ*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
नाशिक :- मालेगाव महानगरपालिकेतील माहिती अधिकारात पारदर्शकता न राखल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, माहिती मागवणाऱ्या RTI कार्यकर्त्याला शिवीगाळ आणि धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. RTI कार्यकर्ते रामदास बच्छाव यांनी दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी मालेगाव महानगरपालिकेचे विभागप्रमुख संजय पवार यांच्याकडे एक दिवसाची हालचाल रजिस्टर (Movement Register) माहिती अधिकार कायद्यानुसार मागवली होती. या अर्जाच्या उत्तरादाखल बच्छाव यांना 28 रुपये शुल्क भरण्याचे पत्र देण्यात आले. बच्छाव यांनी ते शुल्क भरल्यानंतरही त्यांना “मागितलेली माहिती निरंक आहे” असे सांगण्यात आले. या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे बच्छाव यांनी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपीलची सुनावणी दिनांक 12 जून 2025 रोजी पार पडली.
सुनावणीवेळी बच्छाव यांनी “माहिती जर उपलब्धच नाही तर चलन का घेतले गेले?” असा सवाल उपस्थित केला. यावरून विभागप्रमुख संजय पवार यांच्याशी वाद वाढला. सुनावणीदरम्यानच संजय पवार यांनी RTI कार्यकर्ते बच्छाव यांना अरे तुरे करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकाराची दखल घेऊन राज्य माहिती अधिकार संघटनेने संबंधित संजय पवार यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मालेगाव महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.
RTI कार्यकर्त्यांवर होत असलेले दबाव व दडपशाहीचे प्रकार अत्यंत निंदनीय असून, यामुळे सामान्य नागरिकांचा माहिती अधिकार प्राप्त करण्याचा हक्कच धोक्यात येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता विविध सामाजिक संघटनांकडून होऊ लागली आहे.