काली पुजा आणि सिंदूर खेला उत्सवातून बंगाली संस्कृतीचा जागर; पुणे येथील सोमवार पेठ मध्ये मिरवणुकीसह विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

काली पुजा आणि सिंदूर खेला उत्सवातून बंगाली संस्कृतीचा जागर; पुणे येथील सोमवार पेठ मध्ये मिरवणुकीसह विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

पुणे: दि. १५/ पुणे येथील सोमवार पेठेतील समर्थ व्यायामशाळा मैदानात बंगाली समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्यामा काली पूजा आणि सिंदूर खेला उत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नुकताच पार पडला. तीन दिवस चाललेल्या या उत्सवाचे यंदा २६ वे वर्ष होते. विशेष म्हणजे, या उत्सवात जात-धर्माचे बंध बाजूला ठेवून विविध समाजांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यंदा बंगाली स्वर्णकार समाजानेही उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.

उत्सवादरम्यान चित्रकला व क्रीडा स्पर्धा, पूजा, पुष्पांजली आणि प्रसादवाटप करण्यात आले. तसेच आरती, खिचडी प्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी महिलांनी सिंदूर खेला उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर मिरवणुकीने उत्सवाची सांगता झाली.
समर्थ व्यायामशाळा मैदानातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली मिरवणूक डुल्या मारुती, सोन्या मारुती, फडके हौद, लाल महाल आणि देसाई कॉलेज मार्गे सिद्धेश्वर घाटावर पोहोचली. तेथे धार्मिक विधी करून देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या उत्सवातून पुण्यातील बंगाली संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडले.



