अखिल महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न

अखिल महाराष्ट्र राज्य रेडिओ श्रोता संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : दर दरवर्षी २० ऑगस्ट हा दिवस रेडिओ श्रोता दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असतो. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय श्रोता संमेलन वेगवेगळ्या जिल्ह्यात क्रमाक्रमाने आयोजित केले जाते. मागील वर्षी हे श्रोता संमेलन अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावर्षी हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. संयोजन समितीने दिनांक 19 व 20 ऑगस्ट दोन दिवस येथील साखरे मंगल कार्यालय या ठिकाणी हे संमेलन आयोजित केले होते. या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यातून परभणी, नांदेड, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, वाशिम अशा विविध ठिकाणाहून सुमारे २०० श्रोत्यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर विविध रेडिओ केंद्राचे निवेदक, आर.जे.(रेडिओ जॉकी) व उद्घोषक यांनी देखील सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला विविध ठिकाणाहून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते संमेलन ठिकाणी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण झाली. रेडिओ स्टेशन कसे असावेत विविध रेडिओवर कोणत्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित व्हावेत या संदर्भात चर्चा झाली आणि ही चर्चा याचा सारांश वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे जेष्ठ श्रोते यांनी सांगितले.ज्यामध्ये सुरेश जाधव, प्रकाश बोरगावकर, अशोक पाटील, सय्यद जलालभाई, धोंडीराम सिंग राजपूत, बाहुबली फुरसुले, नसीर शेख,मारुती भोसले,डॉ.नामदेव भुतेकर,मारोतराव पांचाळ, दशरथ सागुते,सय्यद युनूस, आप्पासाहेब जाधव,अमोल निकम अशा अनेक श्रोत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. 20 ऑगस्ट या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.सुजित बनसोडे आणि वृत्तविभाग प्रमुख मा.श्री.समरजीत ठाकूर, सिनेस्टार उदय माळी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर केंद्रप्रमुख श्री.सुजित बनसोडे यांनी सर्व श्रोत्यांच्या उपस्थितीत श्रोत्यांच्या अडीअडचणी समस्या खुल्या संवादात जाणून घेतल्या आणि आकाशवाणी रेडिओ केंद्रावर भविष्यात विविध दर्जेदार कार्यक्रमाचे तरी करण होईल अशी ग्वाही दिली. श्रोत्यांनी देखील या खुल्या संवादात अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या समस्या मांडल्या. ज्यामध्ये शिवदास गलांडे,गजानन बारस्कर,रवींद्र कुडाळकर, गोविंद पिसाळ, मारुती भोसले, अशोक दळे, सुरेश जाधव,नारायणदेव घुगे,सुनील मुंगसे अशा अनेक श्रोत्यांनी आपापले प्रश्न, समस्या मांडल्या. सन्मानपत्र देऊन सर्व श्रोत्यांचे सत्कार करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यावेळी विविध आकाशवाणी व रेडिओ केंद्रांचे निवेदक व आर.जे. यांचा सत्कार करण्यात आला ज्यामध्ये कैलास सदामत,आदिनाथ अन्नदाते,बाळकृष्ण बिडवई,अनिता देव,प्रीती सवाई,स्नेहल पगारे,वसंत फुलके,आर.जे.देवराज यांचा समावेश आहे.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेडिओ चे प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते व अंजली खंडाळीकर यांनी केले.आयोजन समिती अध्यक्ष सौ.अंजली खंडाळीकर,उपाध्यक्ष श्री.सुरेश जाधव,सचिव श्री.प्रकाश बोरगावकर, सल्लागार श्री अशोक पाटील,सय्यद जलाल भाई यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप श्रम घेतले.


