Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथील शेतकऱ्याने जपला वावडी उडविणे हा मर्दानी खेळ

0 7 6 9 4 3

गुंडेगाव येथील शेतकऱ्याने जपला वावडी उडविणे हा मर्दानी खेळ

वाळकी /  प्रतिनिधी : दारासाहेब आगळे

आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या आणि रांगड्या पतंगाची परंपरा आहे.ही परंपरा जपत असताना अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील शेतकरी निखिल संतोष हराळ यांनी ८ फुटाची वावडी बनवली आहे.वावडी म्हणजे एक प्रकारचा मोठा पतंग असतो. सुमारे दोनशे वर्षे जुना इतिहास असणारा कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ म्हणून वावडी कडे पाहिले जाते. हल्ली वावडी हा खेळ लोप पावत चालला आहे. मात्र गुंडेगाव मध्ये आजही वावडी बनवून हा खेळ खेळला जात असुन ही परंपरा जपण्याचे काम हराळ यांनी केले आहे. तसेच हा खेळ पाहण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.गुंडेगाव येथे नागपंचमीनिमित्त अनेक पिढ्यांपासून पाच फुटापासून ते आठ फुटापर्यंतच्या वावड्या तयार करणे आणि त्या उडविणे हा अनोखा व पारंपारिक खेळ खेळला जातो.
वावडी हा प्रकार पतंगासारखा नाजूक, देखणा वगैरे नाही तर पेहेलवानासारखा दणकट असतो. तुमच्या शक्ती आणि युक्तिचा कस पाहणारा असतो यालाच वावडी म्हणतात.वावड्या उडविणे हे हा खेळ श्रावणामध्ये खेळला जातो.या काळात जेथे पाऊस कमी आणि वारा खूप असतो अशा गावांमध्ये, अशा ठिकाणांवर हा खेळ खेळला जातो.तसेच आजसुद्धा हा दुर्मिळ खेळ आणि त्याच्या स्पर्धा काही गावांमध्ये आवर्जून आयोजित केला जातो. ही वावडी पतंगापेक्षा कितीतरी पट मोठी असते.ही वावडी आकाशात उडविण्यासाठी नाजूक पातळ मांजा वापरणे शक्यच नसल्याने यासाठी चक्क सुंभाची जाड दोरी ( रस्सी ) किंवा नायलाॅन दोरी लावली जाते. दोरीचे बंडल धरण्यासाठी दोन माणसे उडविण्यासाठी ३ / ४ माणसे लागतात. वावडीने आकाशात झेप घेतल्यावर ती नियंत्रित करायला जमिनीवरील माणसांना शक्ती आणि चातुर्य दोन्ही लागते.तसेच ही दोरी धरलेली माणसे वाऱ्यामुळे दोरीबरोबर उचलली जातात. यावरून आपल्याला वाऱ्याच्या प्रचंड शक्तीची कल्पना येते यावेळी दोरी जर प्लॅस्टिकची असेल तर ती हातात घट्ट पकडता येत नाही. वावडी साठी लागणारे सर्व साहित्य हे पर्यावरणपूरक आहे. आकाशात उडणाऱ्या पक्षांना हे मोठे अडथळे लांबूनही लक्षात आल्याने त्यात अडकून मृत्यू येणे टळते. यामध्ये कापाकापी चालत नसल्याने त्यामुळे संभाव्य अपघात टळतात. वाऱ्याचा प्रवाह कमी झाल्यास वावडी अचानक खाली न कोसळता सावकाश खाली उतरविता येते.अशी माहिती गुंडेगाव येथील शेतकरी निखिल संतोष हराळ यांनी दिली.

पूर्वी गावांमध्ये या वावड्या उडविल्या जात असत. परंतु काळाच्या ओघात ही कला व खेळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.परंतु आपली जुनी सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम आम्ही गुंडेगावातील तरुण शेतकरी करत आहोत. वावडीचा आकार,ती किती उंची गाठते,कितीवेळ आकाशात राहते हे पहाताना एक आनंद वेगळा असतो मिळतो.तसेच यातून निसर्गाच्या सानिध्यात राहूनही आनंद मिळतो.. – – –

निखिल हराळ – शेतकरी, गुंडेगाव.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे