कुताळ मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहात तरुणांचा विचार एकत्र; हनुमान भक्तीने घडवला अभूतपूर्व सोहळा – ह.भ.प. योगीराज महाराज पवार शास्त्री….

कुताळ मळा येथील अखंड हरिनाम सप्ताहात तरुणांचा विचार एकत्र; हनुमान भक्तीने घडवला अभूतपूर्व सोहळा – ह.भ.प. योगीराज महाराज पवार शास्त्री….
गुंडेगाव / प्रतिनिधी : संजय भापकर
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कुताळ मळा परिसरात पार पडलेला भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याने भक्तिरसात न्हाऊन निघाला. सात दिवस अखंडपणे हरिनाम, कीर्तन, प्रवचन व भजनाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सप्ताहाच्या समाप्तीप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
सांगता काल्याच्या कीर्तनप्रसंगी ह.भ.प. योगीराज महाराज पवार शास्त्री यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कुताळ मळ्यातील तरुणांनी आपला विचार एकत्र आणत अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करून दाखवला आहे. हनुमानाची ताकद मोठी आहे. भक्ती, श्रद्धा आणि एकजूट असेल, तर कोणतेही कार्य अशक्य नाही. हा सोहळा घडवून आणण्यात हनुमान भक्तीच प्रमुख शक्ती ठरली आहे.”
महाराज पुढे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून समाजहिताचे व अध्यात्मिक कार्य हाती घेतल्यास गावाचा आणि देशाचा सर्वांगीण विकास निश्चित होईल. कुताळ मळ्यातील तरुणांनी दाखवलेली शिस्त, उत्कृष्ट नियोजन आणि भक्तिभाव इतर गावांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान दररोज विविध ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने, हरिपाठ तसेच सकाळ-संध्याकाळ हरिनामाचा गजर होत होता. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या संपूर्ण सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जय मल्हार तरुण मंडळ कुताळ मळा तसेच ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भक्ती, सेवा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा हा अखंड हरिनाम सप्ताह कुताळ मळ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, अशी भावना भाविकांत व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठ संचालन ह.भ.प. संभाजी महाराज भापकर यांनी केले. ह.भ.प. अशोक महाराज पिंपरकर, मृदुंग वादक ह.भ.प. अवधेष महाराज राऊत, गायनाचार्य ह.भ.प. गणेश महाराज नानकिल्ले, ह.भ.प. अनिरुद्ध महाराज नालेगावकर यांची संगीत साथ लाभली.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, युवा नेते दादासाहेब दरेकर, उपसरपंच नानासाहेब हराळ, माजी उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, भाऊसाहेब हराळ, जयश्रीताई कुताळ, दादासाहेब आगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. काकासाहेब कुताळ, डॉ. प्रशांत कुताळ, संजय भापकर, शहाजी कुताळ, निलेश कुताळ, अंकुश कुताळ, भानुदास कुताळ, हेमंत कुताळ, बापू कुताळ, नितीन कुताळ, सचिन कुताळ, सुनील कुताळ, शरद कुताळ, संजय कुताळ यांच्यासह जय मल्हार तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



