एस. एम. चोखशी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नशा मुक्त भारत आणि फिट इंडिया अभियानाचे यशस्वी आयोजन; ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन

एस. एम. चोखशी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये नशा मुक्त भारत आणि फिट इंडिया अभियानाचे यशस्वी आयोजन; ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सुरु असलेल्या ‘एक महिना सेवा भाव’ उपक्रमांतर्गत आणि ‘विकसित भारत मिशन २०४७’ अभियानाच्या निमित्ताने आज एस. एम. चोखशी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे येथे नशा मुक्त भारत आणि फिट इंडिया अभियानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री मनीष घोडके आणि श्री किशोर देशपांडे सर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ. भाग्यश्री दिघे मॅडम यांच्या हस्ते वनमाला बाबनराव वैद्य मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन, करमाळा, जि. सोलापूर चे संस्थापक अध्यक्ष श्री महेश वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. श्री महेश वैद्य यांना नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियानाचे ब्रँड अॕम्बेसेडर म्हणून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास श्री किशोर देशपांडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांना मिशन विकसित भारत २०४७ साठी आजपासूनच संकल्प करण्यास सांगण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात महेश वैद्य म्हणाले, “आपला देश आज विविध क्षेत्रात उच्च स्थानावर पोहोचत आहे, मात्र एका सर्वेक्षणानुसार देशातील तरुण वर्ग वेगाने ड्रग्सच्या आहारी जात आहे. शत्रू राष्ट्र आपल्याला समोरासमोर पराभूत करू शकत नाहीत, म्हणून त्यांनी गुप्त अजेंडा तयार केला आहे की ड्रग्सच्या माध्यमातून देशातील युवकांना बरबाद करायचे. यावर मात करण्यासाठी हे अभियान शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे.” फाउंडेशनच्या माध्यमातून फिट इंडिया अभियानांतर्गत युवकांना मूलभूत व्यायामाचे प्रशिक्षण देण्याचे काम तळागाळापर्यंत केले जात आहे. महेश वैद्य गेल्या २८ वर्षांपासून फिटनेस प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नशा मुक्त समाज आणि सशक्त समाज हेच महेश वैद्य यांचे विकसित भारताचे मिशन आहे. पुण्यामध्ये श्री किशोर देशपांडे सर, श्री मनीष घोडके सर, श्री प्रशांत पाटील सर, श्री शशिकांत देशपांडे सर आणि श्री इक्बाल शेख यांच्या माध्यमातून या कार्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे महेश वैद्य यांनी सांगितले.
चौक्सी हायस्कूल ची स्थापना सन.1937 स्वातंत्र पूर्व काळातील आहे हे विशेष. या शाळेमध्ये बऱ्याच मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ला भेट दिली आहे. अशा हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधन करण्याचे भाग्य लाभले अशा प्रकारची भावना महेश वैद्य यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. शेवटी महेश वैद्य यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानले. श्री किशोर देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना नेहमी हसत आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला.
या उपक्रमाचे यशस्वी संकलन श्री सौरभ खाडेकर यांनी केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरला असून सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला.


