Breaking
ब्रेकिंग

६० दिवसात कांदा उत्पादनाचा दावा; टाकळीभान येथे साठी कांदा तंत्रज्ञान प्रशिक्षण व शिवार फेरी संपन्न

0 8 6 5 2 0

*६० दिवसात कांदा उत्पादनाचा दावा; टाकळीभान येथे साठी कांदा तंत्रज्ञान प्रशिक्षण व शिवार फेरी संपन्न*

राहुरी तालुका जावेद शेख

पारंपरिक पद्धतीने कांदा उत्पादनासाठी लागणारा वेळ, वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची उपलब्धता या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर टाकळीभान ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर येथील प्रगतिशील शेतकरी श्री नामदेव येवले यांच्या शेतातील ६० दिवसात कांदा उत्पादनाचा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.

दि १ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता नामदेव येवले यांच्या शेतावर साठी कांदा म्हणजे लागवडीपासून ६० दिवसात कांदा उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यजमान शेतकरी श्री नामदेव येवले यांनी साठी कांदा लागवड कशी केली याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

*२०० क्विंटल उत्पादन, ८ लाख उत्पन्नाचा दावा आणि आर्थिक हिशोब*

शेतकरी श्री नामदेव येवले यांच्या माहितीनुसार या पद्धतीने सुमारे ६० दिवसांत २०० क्विंटल कांदा उत्पादन झाले असून ४० रुपये किलो दर मिळाल्याने सुमारे ८ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

श्री येवले यांच्यासोबत उपस्थित कृषीभूषण श्री विष्णू जरे पाटील यांनी आर्थिक बाबींचा लेखाजोखा मांडला. त्याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रावर दोन एकर लागवडीसाठी गोठी कांदा तयार करण्यासाठी सर्व खर्चासह रु २३,३०० खर्च आला. तर जून अखेर ते जुलैमध्ये दोन एकर गोठी कांदा लागवड ते काढणीपर्यंतचा सर्व खर्च रु ९७,८०० आला. असा दोन एकरचा एकूण खर्च रु १,२१,१०० झाला असल्याचे सांगण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

*तंत्रज्ञानाची पद्धत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन*

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे आणि प्रमुख कृषीविद्या विभाग तथा तत्कालीन प्रमुख कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र राहुरी डॉ आनंद सोळंके यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी सांगितले की महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानाची शिफारस केली असून डॉ आर व्ही पाटील यांनी यावर पीएचडी केली आहे. सन २०१६-१७ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात १०० एकरवर १०० शेतकऱ्यांच्या शेतावर या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके घेण्यात आली होती. त्यावर्षी ७० ते ८० रुपये किलो दर मिळाला होता.

या तंत्रज्ञानासाठी १५ जानेवारीनंतर ३ किलो फुले समर्थ बियाणे ९ ते १० गुंठ्यावर पेरणी करावी. रोपे ६० ते ६५ दिवसांची झाल्यावर १० ते १२ ग्रॅमची गाठ झाल्यावर उपटून लसणासारख्या जुड्या बांधून मार्च अखेर शेडमध्ये साठवाव्यात. जून-जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यावर गादी वाफा करून १० ते १२ सेंमी अंतरावर गोठी कांदा टोकण करावा. शिफारशीप्रमाणे खते व औषधांचा वापर करावा. ६० दिवसात कांदा विक्रीसाठी तयार होतो.

*मान्यवरांची उपस्थिती*

या कार्यक्रमास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी बियाणे पैदासकार अधिकारी डॉ श्री चंद्रकांत साळुंके, कृषीभूषण श्री विष्णू जरे पाटील बहिरवाडी, कृषीभूषण श्री रवींद्र चव्हाण देवळाली प्रवरा, संभाजीनगर येथील प्रगतिशील शेतकरी श्री घुले, श्री पेंढारकर, उंडे ऍग्रो श्रीरामपूरचे श्री राहुल उंडे पाटील, आदिदिशा सीड्स प्रा लि कंपनीचे सीईओ श्री अंकुश दादा सोळंके यांच्यासह बापूसाहेब नवले, विजय शिंदे, पंकज पटारे, किशोर पुंड, सोमनाथ पुंड, दिंगबर बोरुडे, बाळासाहेब शेरकर, प्रविण आघाडे, गणेश शेळके, राहुल शिंदे व संभाजीनगर, कोपरगाव, श्रीरामपूर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार आदिदिशा सीड्स प्रा लि व उंडे ऍग्रो श्रीरामपूर यांच्यामार्फत करण्यात येणार असून पुढील वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात करण्याचा मनोदय शेतकऱ्यांनी व्यक्त केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री अंकुश दादा सोळंके यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे