500 वृक्षांच्या लागवड व संवर्धनाचा निर्धार ; उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण
पुढील पिढीसाठी निसर्गाचा वारसा निर्माण करण्याचा संकल्प - नगरसेवक दत्ता गाडळकर
500 वृक्षांच्या लागवड व संवर्धनाचा निर्धार ;
उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण
पुढील पिढीसाठी निसर्गाचा वारसा निर्माण करण्याचा संकल्प – नगरसेवक दत्ता गाडळकर
अहिल्यानगर / प्रतिनिधी
अहिल्यानगर : वाढते तापमान, कमी होत चाललेले हरित क्षेत्र आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवक्रांती प्रतिष्ठान आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित कल्याण रोड परिसर संकल्प मोहिमेचा’ शुभारंभ करण्यात आला. विद्या कॉलनी येथे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत परिसरात 500 वृक्षांची लागवड करून त्यांचे दीर्घकालीन संवर्धन करण्याची जबाबदारी शिवक्रांती प्रतिष्ठान आणि नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी स्वीकारली आहे. केवळ झाडे लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता प्रत्येक वृक्षाचे संगोपन, संरक्षण आणि नियमित देखभाल करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शुभारंभप्रसंगी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, प्रा. भगवानराव काटे, भाऊसाहेब सोनवणे, सुरेश ढवळे, बाबासाहेब आंधळे, बबनराव तोडकर, वायकर, परशुराम कोतकर, थोटे, भापकर, शक्ती सोनवणे, अभय शेंडगे, मंगेश भापकर यांच्यासह युवा कार्यकर्ते हर्षल दावभट, सर्वेश गाडळकर, सौरव ढवळे, शंतनू गाडळकर, सुरज साळवे, समद सय्यद, कपिल जुंद्रे व परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. आज वाढते तापमान, प्रदूषण आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही गंभीर चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे. वृक्ष म्हणजे भविष्यातील पिढ्यांना दिलेली सर्वात मोठी भेट आहे. महापालिकेच्या हरित शहर उपक्रमाला हातभार लावण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानने घेतलेला हा पुढाकार इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरेल. महापालिकेच्या माध्यमातून अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना कायम प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक दत्ता गाडळकर म्हणाले की, आज जगभरात हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. वाढते तापमान, अनियमित पाऊस, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ, अशा संकटांचा सामना संपूर्ण जग करत आहे. थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्येही विक्रमी उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. ‘हरित कल्याण रोड’ हा केवळ एक उपक्रम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करण्याचा संकल्प आहे. आम्ही 500 वृक्षांची लागवड करून प्रत्येक झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारत आहोत. नागरिक, युवक आणि महिलांनीही या अभियानात सहभागी होऊन प्रत्येक वृक्ष आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपण्याचे त्यांनी आवाहन केले.
उपस्थित मान्यवरांनीही पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त करत अशा उपक्रमांची व्याप्ती शहरातील इतर प्रभागांमध्येही वाढविण्याचे आवाहन केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे आणि उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


