शिवजयंती म्हणजे स्वाभिमान, संस्कृती जपण्याचा व प्रेरणेचा दिवस – – कुलगुरू डॉ. विलास खर्चे
शिवजयंती म्हणजे स्वाभिमान, संस्कृती जपण्याचा व प्रेरणेचा दिवस – – कुलगुरू डॉ. विलास खर्चे
राहुरी तालुका जावेद शेख
21वे युग हे नवीन तंत्रज्ञानाचे, स्पर्धेचे युग आहे. यामध्ये आपण शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपले ध्येय ठरविले पाहिजे. सातत्य, शिस्त व मेहनतीने ते ध्येय पूर्ण केले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाचा अंगीकार करून जनतेचा सन्मान, महिलांबद्दलचा आदर व प्रशासनातील पारदर्शकपणा जपायला हवा. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमतांची जाणीव स्वतःला करून दिली पाहिजे. आपल्या नेतृत्वामधून तसेच आपल्या कृतीतून समाजाला योग्य दिशा द्यायला हवी. शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठी स्वाभिमान तसेच संस्कृती जपण्याचा व प्रेरणेचा दिवस होय असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय, पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून कोल्हापुर येथील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश लोळगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, सौ. सुरुची खर्चे मॅडम, नगररचना व मूल्य निधी विभागाच्या रचना सहाय्यक सौ. ललिता लोळगे व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना प्रा. गणेश लोळगे यांनी ढाल तलवारीच्या पलीकडील छत्रपती शिवराय या विषयावर बोलताना म्हणाले की रयतेचा स्वाभिमान जागा करून रयतेसाठी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे पहिले राजे होते. शिवाजी महाराज एक उत्कृष्ट अभियंता तसेच व्यवस्थापनातील तज्ञ होते. शिवाजी महाराजांनी समुद्रबंदी मोडून व्यापार खुला केला. त्या काळात जागतिकीकरणाचा नवविचार त्यांनी प्रत्यक्षात कृतीद्वारे आणला. शिवाजी महाराजांनी ढाल तलवारीच्या पलीकडे जाऊन उत्कृष्ट व्यवस्थापनाचा धडा येथील मातीला दिला. शिवचरित्र आपल्याला निष्ठा, धैर्य, पराक्रम, प्रामाणिकपणा, कष्ट, नियोजन शिकविते. आयुष्यात कोणत्या टप्प्यावर काय करायचं याचा विचार असणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जगावेगळा विचार करायला हवा. शिवाजी महाराजांची शेतीविषयक धोरणे आजही दिशादर्शक आहेत. त्यांनी अवजारे तसेच धान्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. शिवाजी महाराजांचा फक्त एक गुण जरी अंगीकारता आला तरी तुम्ही तुमचे आयुष्य आत्मविश्वासाने जगाल असे ते यावेळी म्हणाले. आई-वडिलांचा आदर व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य करणे म्हणजेच शिवचरित्र अंगीकारणे होय. शिवाजी महाराजांकडून बोध घ्या आणि स्वतःच्या जगण्याचा शोध घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थिताना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्याची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करून दिली . कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींनी लाट्या काठ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर शिवज्योत मिरवणुकीने प्रशासकीय इमारतीसमोर आणून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व महात्मा मुलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षातील विद्यार्थी मनीष भरते याने एकपात्री प्रयोग सादर केला. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएस च्या छात्रांनी श्री गुरु तेज बहादुर साहेब जी 350 वे शहीद समागम वर्ष साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य उगले व विद्यार्थिनी संस्कृती सरोदे यांनी केले तर आभार पद्युत्तर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुदर्शन लाटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर महाविद्यालयाचे तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



