कॉ. बापूसाहेब भापकरांचे विचार व कार्य समाजाला पुढे नेण्यासाठी दिशादर्शक” — कॉ. सुभाष लांडे, ( राज्यसचिव, भाकप )
कॉ. बापूसाहेब भापकरांचे विचार व कार्य समाजाला पुढे नेण्यासाठी दिशादर्शक” — कॉ. सुभाष लांडे, ( राज्यसचिव, भाकप )
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : “कॉ. बापूसाहेब भापकरांची साधी राहणी व उच्च विचारसरणी आजच्या युगात तरुणासाठी अत्यंत मार्गदर्शक आणि समाजामध्ये निरोगी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक बनली आहे. त्यांचे विचार आणि कर्तत्व समाजाला दिशादर्शक असून समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे. आज माणूस आत्मकेंद्रीत होत असून नव्या पिढीने मतदानाचे राजकारण न होऊ देता व्यापक सामाजिक दृष्टीकोन बाळगणे गरजेचे आहे”, असे प्रतिपादन कॉ. सुभाष लांडे, राज्यसचिव, भाकप यांनी येथिल न्यू लॉ कॉलेज आयोजित १९ व्या राज्यभरात नामांकित आंतर महाविदयालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरेपाटील हे होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, प्राचार्य डॉ. एम.एम. तांबे, अॅड. सुभाष भोर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरेपाटील म्हणाले की, “भारतात गरीब-श्रीमंत ही दरी वाढत असून कष्टकरी आणि शेतकरी वर्गास पुढे आणण्यासाठी कॉ. बापूसाहेव भापकरांचे विचार समाजात रुजवून व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे. या देशात वैचारिक चळवळ निर्माण करुन सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी तरुण वर्ग विशेषतः वकिल वर्गाने पुढाकार घेऊन सामाजिक बदल घडविणे आवश्यक आहे”
कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य डॉ. एम. एम. तांबे यांनी केले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. रामेश्वर दुसुंगे यांनी गत स्पर्धेचा आढावा घेवून स्पर्धेचा आलेख यशस्वीरित्या उंचावत असल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापूसाहेबांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पाहुण्यांची ओळख प्रा. डी. बी. मोरे यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रियंका खुळे-कांडेकर यांनी केले तर आभार प्रा. पूनम वडडेपल्ली यांनी मानले. यावेळी राज्यभरातून विविध जिल्हयातील महाविदयालयाचे स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविदयालयाच्या अधिक्षक सौ. हेमा कदम, प्रा. अनुराधा मते, प्रा. अतुल म्हस्के, ग्रंथपाल प्रा. सौरभ साबळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


