करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न आगरी समाज संस्थेचा उपक्रम

*करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न आगरी समाज संस्थेचा उपक्रम
*अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक महत्त्वाचे निर्णय उभे ठाकतात. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, सरकारी आणि खासगी नोकरीमध्ये काय फरक आहे अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मिळावीत, यासाठी आगरी समाज संस्थेच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर शनिवार, दिनांक 11 मे 2025 रोजी सेंट मेरी कॉन्व्हेन्ट शाळा, अलिबाग येथे पार पडले. एकूण 65 युवक-युवतींनी या शिबिरात सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयी जागरूकता मिळाली असून त्यांच्यासाठी योग्य दिशादर्शन झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. सुहास पाटील, निवृत्त सहायक आयुक्त (सेंट्रल एक्साइज विभाग) व सुप्रसिद्ध करिअर व रोजगार मार्गदर्शक होते. त्यांनी उपस्थितांना शासकीय व खासगी क्षेत्रातील संधी, स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास निर्माण आणि योग्य नियोजन या बाबतीत मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न विचारांनी उपस्थित तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. निलेश पाटील (अध्यक्ष, आगरी समाज संस्था) यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली व आगामी योजनांवर प्रकाश टाकला.
प्रमुख पाहुणे श्री. अमरनाथ जुईकर यांचे स्वागत श्री. राजेंद्र पाटील, तर श्री. सुहास पाटील यांचे स्वागत उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर आणि श्री. प्रभाकर ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जागृती पाटील यांनी तर आभारप्रदर्शन श्री. सचिन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेंट मेरी शाळेच्या सिस्टर डायना मॅडम आणि श्री सचिन घरत यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये श्री. मनोहर पाटील, वैभव पाटील, वेदांती म्हात्रे, सई पाटील, संदेश म्हात्रे, कुमार म्हात्रे आणि दिपश्री पाटील याशिवाय संपूर्ण सेंट मेरी नॉन एज्युकेशनल स्टाफ यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी प्रतिक्रिया दिली. युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि समाज उन्नतीच्या दिशेने वाटचाल करावा, या उद्देशाने आगरी समाज संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.