गुंडेगावात कांदा बनला ‘आगार’; पण बाजार न मिळाल्याने शेतकरी निराश….*
_अतिवृष्टीमुळे आणि ओलसर हवामानामुळे चाळीत कांदा सडला; कष्टावर पाणी_
*गुंडेगावात कांदा बनला ‘आगार’; पण बाजार न मिळाल्याने शेतकरी निराश….*
_अतिवृष्टीमुळे आणि ओलसर हवामानामुळे चाळीत कांदा सडला; कष्टावर पाणी_
( गुंडेगाव / प्रतिनिधी : संजय भापकर )
यंदा पावसाच्या अनियमिततेने आणि बाजारभावाच्या घसरणीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गुंडेगाव परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र, बाजारभाव न मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवून ठेवला. परंतु सततच्या अतिवृष्टीमुळे आणि ओलसर हवामानामुळे तो कांदा चाळीतच सडू लागला आहे.
गावात सर्वत्र कांद्याचे छोटे–मोठे ‘आगार’ तयार झाले असून, एका बाजूला सडलेल्या कांद्याचे ढीग आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी अशी हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळत आहेत.
“घाम गाळून उगवलेला कांदा डोळ्यासमोर कुजताना पाहावा लागतो, एवढं दुर्दैव आमचं,” अशा शब्दांत शेतकरी आपली व्यथा व्यक्त करत आहेत. बाजारात भाव नाही, वाहतुकीचा खर्च जास्त, आणि साठवणुकीचा तोटा — या तिहेरी संकटाने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत.
या वर्षी गुंडेगाव परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. बी-बियाणे, खतं, मजुरी, वीज, सिंचन — सर्व खर्च हेक्टरी साठ ते सत्तर हजार रुपयांच्या घरात गेला. एवढं करूनही भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवून ठेवला ह़ोता. पण सततच्या पावसामुळे ओलसरपणा वाढला आणि काही दिवसांतच कांदा चाळीत सडू लागला.
“आता आमच्या मेहनतीचे अश्रूच ओघळतायत, कांद्याचं पाणी झाले…” असं म्हणत शेतकरी मनोमन व्यथित झाले आहेत. एकेक गोणी कांदा उचलताना कंबर तुटली, पण आज त्या गोण्या दुर्गंधी सोडत पडल्या आहेत — हा दृश्य प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयाला छेद देणारे आहे.
(सत्य वास्तव लेख – संजय भापकर,पत्रकार)



