औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव — आडसूळ पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची प्रॉमिंड ए.आय. प्रा. लि. येथे शैक्षणिक औद्योगिक भेट
औद्योगिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव — आडसूळ पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची प्रॉमिंड ए.आय. प्रा. लि. येथे शैक्षणिक औद्योगिक भेट
एस डब्ल्यू न्यूज / धीरज लांडगे
चास, अहिल्यानगर : सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक, चास-अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तांत्रिक ज्ञान अधिक दृढ करण्यासाठी विविध शैक्षणिक व उद्योगाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळावा, उद्योगक्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रॉमिंड ए.आय. प्रा. लि. या नामांकित आयटी कंपनीला शैक्षणिक औद्योगिक भेट (Industrial Visit) आयोजित करण्यात आली.
या औद्योगिक भेटीदरम्यान कंपनीचे मॅनेजर श्री. वारघुडे सर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची स्थापना, कार्यपद्धती, विविध प्रकल्पांची रचना आणि आयटी इंडस्ट्रीमधील प्रत्यक्ष कामकाज याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील सध्याचे ट्रेंड्स, कंपन्यांची अपेक्षा आणि काम करण्याची पद्धत याविषयीही मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, केवळ शैक्षणिक गुण पुरेसे नसून तांत्रिक ज्ञानासोबतच कम्युनिकेशन स्किल, समस्या सोडवण्याची क्षमता, टीमवर्क आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाणारे सामान्य प्रश्न, त्यांची योग्य उत्तरे देण्याची पद्धत, तसेच प्रभावी बॉडी लँग्वेज कशी ठेवावी याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संबंधित नोकरीच्या संधी तसेच सॉफ्टवेअर विकास आणि चाचणी या क्षेत्रांतील वाढत्या करिअर संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी AI, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत या क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच कंपनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध सॉफ्टवेअर्स, टूल्स आणि प्रोजेक्ट डेव्हलपमेंट प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील कामकाजाची प्रत्यक्ष कल्पना मिळाली आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडली.
कंपनीकडून नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या विविध कोर्सेसची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्य विकसित करता येतील आणि त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या औद्योगिक भेटीत द्वितीय वर्ष संगणक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांशी थेट संवाद साधत विविध तांत्रिक व करिअरविषयक प्रश्न विचारले आणि त्यांचे समाधानकारक निरसन करून घेतले. या संवादातून विद्यार्थ्यांमध्ये नवीन शिकण्याची प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य प्रा. गडाख आर. एस. यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “औद्योगिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांच्या कौशल्यांचा विकास होतो आणि उद्योगक्षेत्रात यश मिळविण्यास मदत होते.”
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध आडसूळ, सचिव सौ. लिनाताई आडसूळ, डायरेक्टर श्री. कृष्णा आडसूळ, खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.
या औद्योगिक भेटीच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक व कर्मचारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच विद्यार्थ्यांनीही शिस्तबद्ध व उत्साही सहभाग नोंदवून या उपक्रमाचे यश अधिक वृद्धिंगत केले.
विद्यार्थ्यांनी या औद्योगिक भेटीतून मौल्यवान ज्ञान, उद्योगक्षेत्राची समज आणि भविष्यातील करिअरविषयी स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन ते उद्योगक्षेत्रासाठी अधिक सक्षम बनत आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले.



