यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक वाढणार

यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक वाढणार
===°===°=====^====
महाराष्ट्राच्या अनेक भागात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. पेरण्या झाल्या पण उगवलं काहीच नाही. शेतात बघावं तर फक्त भेगाळलेली जमीन आणि करपलेली पिकं दिसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि जमिनीतील पाण्याची पातळी बघता, यंदा दुष्काळाची तीव्रता गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी पटीने वाढणार हे स्पष्ट दिसत आहे. हे फक्त हवामानाचं संकट नाही तर मानवी चुकांचं फळ आहे.
आपणच झाडं तोडली, डोंगर उजाड केले, नद्या-नाल्यांवर अतिक्रमण केले आणि पाण्याचा बेसुमार उपसा केला. पाणी आडवा, पाणी जिरवा ही घोषणा फक्त घोषणाच राहिली. प्रत्यक्षात बोअरवेलने भूगर्भातील पाण्याचा थेंब न थेंब उपसला. आता निसर्गाने हिशोब मागायला सुरुवात केली आहे.
दुष्काळाची झळ फक्त शेतकऱ्याला नाही तर प्रत्येकाला बसणार आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे आणि बेरोजगारी वाढून तरुण शहराकडे स्थलांतर करत आहेत. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
सरकारने वेळीच दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. रोजगार हमी, चारा छावण्या, पाणी टंचाईवर युद्धपातळीवर काम आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे ही काळाची गरज आहे. पण फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपणही पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे.
ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही तर एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याची आहे. पाणी वाचवा, झाडं लावा, हाच खरा दुष्काळावरचा उपाय आहे. नाहीतर यंदाची दिवाळी अनेक घरात अंधारातच जाणार आहे, हे लक्षात ठेवा.
=लेखक=
प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी



