अहिल्यानगर : भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक..! मुख्यमंत्री फडणवीसांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांचे केले अभिनंदन
अहिल्यानगर : भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक..! मुख्यमंत्री फडणवीसांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांचे केले अभिनंदन

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहील्यानगर : अहील्यानगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेले यश म्हणजे भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.हा विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अहील्यानगरच्या जनतेला समर्पित करत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहीते, विनायक देशमुख, सुनील रामदासी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील आशीर्वाद बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक व युतीच्या कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष साजरा केला. भगव्या गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी मंत्री विखे पाटील यांनी जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून मंत्री विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.


