नगर शहरातील वारुळाचा मारुती म्हणजे साधुसंतांची तपोभूमी ; नागपंचमीचे श्रद्धास्थळ

नगर शहरातील वारुळाचा मारुती म्हणजे साधुसंतांची तपोभूमी ; नागपंचमीचे श्रद्धास्थळ
एस डब्ल्यु न्यूज नेटवर्क
नगर -सीना नदीच्या पलीकडे, निसर्गरम्य वातावरणात आणि हिरव्यागार झाडाझुडपांच्या सान्निध्यात वसलेले वारुळाचा मारुती मंदिर हे अहिल्यानगरच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेतील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. साधुसंतांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या या परिसराला नागपंचमी यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे जाणकार सांगतात.
वारुळाचा मारुती मंदिर परिसर सीना नदीच्या पलीकडे असून, मंदिराभोवती असलेल्या झाडीमुळे या ठिकाणचे वातावरण अत्यंत रम्य आणि प्रसन्न आहे. पूर्वी निजानंद स्वामींचा भैरवी मठ काही काळ या परिसरात होता, अशी स्थानिक परंपरा सांगते. अहिल्यानगरचे संत श्री जयराम नाना यांनी याच परिसरात लिंबाच्या झाडावर बसून तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली, अशीही श्रद्धा आहे. त्यामुळे हा परिसर साधुसंतांच्या साधना आणि तपश्चर्येने पावन झालेली भूमी म्हणून ओळखला जातो.
निजानंद स्वामी आणि भैरवी मठाची परंपरा-अहिल्यानगर शहराच्या इतिहासाशी भैरवी संप्रदायाचा संबंध असल्याचे विविध ऐतिहासिक संदर्भांतून सांगितले जाते. अहिल्यानगरचा किल्ला ज्या परिसरात उभारण्यात आला, त्या भागात पूर्वी भैरवी संप्रदायाचा मठ असल्याची परंपरा आहे. भिंगार नदीच्या दक्षिणेस एका पुरातन देवीचे देवालय होते. कालांतराने हे मंदिर अस्तित्वात राहिले नाही; मात्र त्याच्या अवशेषांच्या परिसरात नंतर सटवाईचे देऊळ उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. या देवालयाच्या पश्चिमेस भैरवी मठ असल्याची माहिती स्थानिक इतिहासात आढळते.
अहमद निजामशहाच्या काळात या मठात निजानंद नावाचे एक सिद्धपुरुष वास्तव्य करीत होते, अशी आख्यायिका आहे. त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा लौकिक तत्कालीन राजापर्यंत पोहोचला होता. संकटाच्या काळात अहमदशहा या सिद्धपुरुषांच्या आश्रयाला गेला आणि त्यांच्या आशीर्वादाने त्याला यश प्राप्त झाले, अशी श्रद्धा आहे. या साधुपुरुषाच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाचा समावेश निजामशहाच्या नावात करण्यात आला आणि पुढे ‘निजाम’ हे नाव प्रचलित झाले, अशी लोकपरंपरा सांगते.
निजानंद बाबांची समाधी किल्ल्याच्या पश्चिम दरवाज्याजवळ असल्याचेही सांगितले जाते. पुढे किल्ल्याचा विस्तार वाढल्यानंतर भैरवी पंथाने आपले ठाणे वारुळाचा मारुती परिसरात आणले. बागरोजा परिसरात अहमदशहाची कबर आणि वारुळाचा मारुती परिसरातील भैरवी परंपरा यामुळे गुरू-शिष्याच्या सान्निध्याची ही परंपरा इतिहास आणि श्रद्धेचा अनोखा संगम ठरते.
नागपंचमीची शेकडो वर्षांची परंपरा -वारुळाचा मारुती येथे दरवर्षी नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा भरते. या यात्रेला स्थानिक भाविकांच्या श्रद्धेचे विशेष स्थान आहे. नगर शहरासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात.
भारतीय संस्कृतीने निसर्गातील प्रत्येक जीवामध्ये ईश्वरी तत्त्व पाहण्याची शिकवण दिली आहे. नाग हा पर्यावरणातील महत्त्वाचा सरपटणारा प्राणी असून, भारतीय संस्कृतीत त्याला देवतेचे स्थान देण्यात आले आहे. भगवान विष्णू, भगवान शंकर आणि श्री गणेश यांच्या प्रतिमांमध्येही नागाचे महत्त्वपूर्ण स्थान दिसून येते.
भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे नागाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात सापांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे निसर्गचक्रातील या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून नागपंचमीचा सण साजरा करण्याची परंपरा निर्माण झाली.
महिला आणि मुलींच्या आनंदाचा सण-नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी मुली आणि महिला श्रावणातील पारंपरिक गीते गातात. झोक्यावर झुलणे, फेर धरून गाणी म्हणणे, नृत्य करणे अशा विविध उपक्रमांतून आनंद व्यक्त केला जातो. या पारंपरिक खेळांमुळे मनावरील ताण कमी होतो, मन प्रसन्न होते आणि उत्साह वाढतो. त्यामुळे नागपंचमी हा धार्मिक श्रद्धेबरोबरच लोकपरंपरा, स्त्रीजीवन आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती जपणारा सण आहे.
मंदिर विकासासाठी तरुणाईचा पुढाकार-वारुळाचा मारुती मंदिर परिसराच्या विकासासाठी नालेगाव परिसरातील तरुण मंडळी पुढाकार घेत आहेत. मंदिरालगतच्या मठाची तसेच दोन खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
तपोभूमीचा वारसा जपूया…साधुसंतांच्या तपश्चर्येने पावन झालेला इतिहास, भैरवी संप्रदायाची परंपरा, संत जयराम नानांची साधना, नागपंचमीची शेकडो वर्षांची यात्रा आणि निसर्गाशी जोडलेली लोकसंस्कृती असा समृद्ध वारसा वारुळाचा मारुती परिसराला लाभला आहे.
हा वारसा केवळ श्रद्धेपुरता मर्यादित न ठेवता मंदिराचा विकास, परिसराचे संवर्धन, पाणी व्यवस्था, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी तरुणाईने पुढाकार घेतला असून भाविक, ग्रामस्थ या सर्व उपक्रमात सहभागी होतात. वारुळाचा मारुती परिसर भविष्यात अहिल्यानगर मधील एक सुंदर धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.



