रुग्णालयांचा श्वास गुदमरतोय अतिक्रमणच्या विळख्यात ; रुग्णवाहिकेलाच जागा नाही रुग्णालयात

रुग्णालयांचा श्वास गुदमरतोय अतिक्रमणच्या विळख्यात ;
रुग्णवाहिकेलाच जागा नाही रुग्णालयात
अहिल्यानगर : नगर शहरातील अनेक हॉस्पिटल जवळील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे . यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे . फक्त दिखाव्यापुरता कारवाईचा फार्स केला जातो नंतर परिस्थिती जैसे थे च रहाते .अशीच अवस्था आता शहर आणि उपनगर भागात हॉस्पिटल जवळच्या विविध अतिक्रमणाने झाली आहे .
बहुतेक सर्वच लहान मोठ्या हॉस्पिटल बाहेर अगदी गेटला चिकटूनच हातगाड्या फेरीवाले खाद्य पदार्थांचे दुकाने लावतात . याला हॉस्पिटल च्या व्यवस्थापनाचा कोणताही विरोध होताना दिसत नाही .परिणामी रुग्णवाहिका लावण्यासाठीही हॉस्पिटल जवळ जागा रहात नाही . रूग्णवाहिका ही अत्यंत तातडीची आवश्यक सेवा असूनही काही ट्रस्ट संस्था यांच्या रुग्णवाहिका हॉस्पिटल पासुन खुप लांब अंतरावर लावल्या जातात ही चिंतेची बाब आहे .
शहरातील झोपडी कॅन्टीन जवळील मॅककेअर हॉस्पिटल ला अतिक्रमणचा विळखा पडलेला दिसून येतो. येथे अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या उभ्या आहेत .बहुतेक विक्रेत्यांकडे खाद्यपदार्थ विक्रीचे कोणतेही परवाने नाहीत . या विक्रेत्यांकडे दारुडे लोक दारू पिण्यासही बसतात अशी नागरिकांमधे चर्चा आहे . काही वेळेस या विक्रेत्यांमधे गिऱ्हाईकांवरून भांडणेही होतात .
हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच चहा नाष्टाच्या हातगाड्यांची मोठी संख्या आहे . यामुळे एखादया तातडीच्या घटनेत रुग्णवाहिका हॉस्पिटल मधुन बाहेर किंवा आत येण्यास अडथळे निर्माण होतात . याचा परिणाम रुग्णाला भोगावा लागतो . उपचार करण्यास उशिर होतो . अशावेळी एखादा रुग्ण काही क्षण उशिर झाल्यामुळे उपचाराअभावी दगावल्यास याची जबाबदारी संबंधीत हॉस्पिटल घेईल की प्रशासन घेईल ?
अनेक नावाजलेल्या विविध हॉस्पिटल जवळील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांवर फेरीवाले, दुकानांचे वाढीव भाग यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात याबाबत संबंधीत प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याची खंत पेशंटचे नातेवाईक, नागरिक व्यक्त करत आहेत . खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे पसरलेले जाळे पाहुन हॉस्पिटल व्यवस्थापन आणि फेरीवाले विक्रेते यांचे काही आर्थिक साटेलोटे आहे का ? अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत .
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आणि शहर वाहतूक पोलीस पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवुन अतिक्रमण काढून रस्ते हॉस्पिटल परिसरातील जागा मोकळी करून रुग्णाचा आणि हॉस्पिटलचा ही श्वास मोकळा करावा असे नागरिक ,रुग्णाचे नातेवाईक अपेक्षा करत आहेत .


