पावसाअभावी नारायणडोहो परिसरातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान; सरसकट पंचनाम्याची मागणी

पावसाअभावी नारायणडोहो परिसरातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान; सरसकट पंचनाम्याची मागणी
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील नारायणडोहो येथे यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ऑगस्ट महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने गावातील खरीप पिके तसेच फळबागा करपून गेल्या आहेत.
पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नारायणडोहो गावातील सर्व खरीप पिके व फळबागांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत मा सरपंच श्री. शंकरराव निवृत्ती साठे व सर्व ग्रामस्थ, नारायणडोहो यांच्या वतीने अहिल्यानगर तहसीलदारांकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
पावसाअभावी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने तातडीने दिलासा द्यावा आणि नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


