सेवा, शौर्य आणि फिटनेसचा संगम : ‘आयर्नमॅन’ आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा सन्मान – डॉ. उद्धव शिंदे

सेवा, शौर्य आणि फिटनेसचा संगम : ‘आयर्नमॅन’ आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा सन्मान – डॉ. उद्धव शिंदे
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : महाराष्ट्र कॅडरचे १९९८ बॅचचे आयपीएस अधिकारी तथा सध्या मुंबई येथे अप्पर पोलीस महासंचालक (ADG) फोर्स-१ म्हणून कार्यरत असलेले ‘आयर्नमॅन’ आयपीएस कृष्ण प्रकाश यांचे अहिल्यानगर दौऱ्यानिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी अहिल्यानगर क्लब येथे आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा शाल व वृक्ष देऊन सन्मान केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आयपीएस कृष्ण प्रकाश हे २०१७ साली ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ पूर्ण करून भारतातील पहिले गणवेशधारी सेवा अधिकारी ठरले असून, वर्ल्ड्स बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांची नोंद झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुंफा हा समुद्र प्रवास पोहून पूर्ण करणारे ते अधिकारी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांची शिस्त, कर्तव्यदक्षता व फिटनेसप्रती असलेली निष्ठा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायदा-सुव्यवस्था, नागरिक पोलिस संवाद आणि शिस्तबद्ध पोलीस प्रशासनासाठी प्रभावी कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळातील अनेक उपक्रम आजही स्मरणात आहेत.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे यांनी, “आयपीएस कृष्ण प्रकाश हे केवळ कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी नसून ते तरुण पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्यातून देशसेवा, शिस्त आणि आरोग्य यांचा समतोल साधण्याचा संदेश मिळतो,” असे मत व्यक्त केले.



