कृषि तंत्र शिक्षणातून कृषि उद्योजकतेला चालना – कुलगुरू डॉ. शरद गडाख*

*कृषि तंत्र शिक्षणातून कृषि उद्योजकतेला चालना – कुलगुरू डॉ. शरद गडाख*
राहुरी तालुका जावेद शेख
कृषि तंत्र शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना कृषि आणि संलग्न व्यवसायाचे कौशल्य आधारित शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील आहे आणि यातूनच विद्यार्थ्यांमधील कृषि उद्योजकतेला चालना मिळेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील कृषि तंत्र विद्यालयाला भेट दिली. यावेळी कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खर्डे यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी कुलगुरु डॉ. गडाख मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की कृषि तंत्र विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध प्प्रकल्पाद्वारे व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न कृषि विद्यापीठ करत आहे. विद्यार्थ्यांसाठी दुग्धव्यवसाय, शेळीपालन,कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, मुरघास उत्पादन तसेच भाजीपाला उत्पादन, रोपवाटिका, रेशीम पालन यासारखे प्रकल्प विकसित करून विद्यार्थ्यांना भविष्यात स्वयंपूर्ण रोजगार मिळू शकेल. या प्रकल्पामधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 50 टक्के लाभाची रक्कम ही या विद्यार्थ्यांसाठी असेल अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की कृषि तंत्र विद्यालय, पुणतांबा हे बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वीरित्या राबवत आहे. याद्वारे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, हरभरा, कांदा यासारख्या पिकांचे उन्नत् वाणाचे बियाणे उत्पादित केले जाते. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी कृषि तंत्र विद्यालयातील व्याख्यान कक्ष, बीजप्रक्रिया केंद्र,मुलांचे तसेच मुलींचे वसतीगृह तसेच डेअरी प्रकल्प, कांदा बियाणे रोपवाटिका आणि बिजोत्पादन प्रक्षेत्राला भेटी देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या आणि मार्गदर्शन केले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि सौ. गडाख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुरुवातीला प्राचार्य डॉ. पंडित खर्डे यांनी कृषि तंत्र विद्यालयाच्या उपक्रमांचे सादरीकरण केले. या भेटीदरम्यान कृषि तंत्र विद्यालय येथील श्री. सोमनाथ लंघे, श्री. किशोर भाकरे, श्री. दिनेश पंडित, श्री. अंबादास इंगळे, श्री. सचिन राऊत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.