Breaking
ब्रेकिंग

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

0 8 6 5 3 0

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

पुणे: दि. ०६/ पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि युवा मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाचा ‘स्वीप’ (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रम, महाविद्यालयाचा ‘मतदार साक्षरता मंच’ आणि ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. विलास उगले उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिकेचे निवडणूक अधिकारी श्री. प्रदीप कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, युवकांचा उत्साह व सहभाग वाढावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धेत ५६, चित्रकला स्पर्धेत १६, तर वक्तृत्व स्पर्धेत २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब गव्हाणे आणि डॉ. जयश्री दाते यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील १२७ हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. यावेळी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रमुख अतिथी श्री. प्रदीप कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व विशद केले. “लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाचे मत अमूल्य आहे आणि सुजाण नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत केवळ मतदार म्हणून नव्हे तर ‘दूत’ म्हणून भूमिका बजावली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भावी नागरिक म्हणून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. महाविद्यालयातील अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सत्यभामा पानसरे यांनी केले. ज्यामध्ये त्यांनी ‘स्वीप’ मोहीम आणि मतदार साक्षरता मंचाच्या उद्दिष्टांची माहिती दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. के. एल. कुमरे यांनी केले. तसेच, कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्रा. शंकर घाडगे व प्रा. सिद्धी कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी देवबा पांडुरंग क्षीरसागर यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल चौरे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.
राष्ट्रगीताने या प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आगामी निवडणुकीबाबत आणि त्यांच्या मताधिकाराबाबत मोठी जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे