Breaking
ब्रेकिंग

समरसता साहित्य परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड

0 9 0 3 6 4

समरसता साहित्य परिषदेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके यांची निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन मराठी साहित्य क्षेत्रात सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेशच्या सोलापूर शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत करमाळा येथील पत्रकार, साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक तथा अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. परिषदेच्या स्थापनेपासून साहित्यिक आणि वैचारिक उपक्रमांत सक्रिय असलेले ज्येष्ठ साहित्यिक प्रा. माधव कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. संस्कृत पंडित आणि विचारवंत डॉ. दुर्गा जोशी यांची महिला आयाम प्रमुखपदी, दत्तात्रय इंगळे यांची कार्यवाहपदी, तर सुधाकर कवडे आणि दिनेश मडके यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी प्रदेश कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, प्रदेश सहकार्यवाह सुहास घुमरे आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी यांनी जाहीर केल्या.

दिनेश मडके हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. साप्ताहिक पवनपुत्रच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तसेच अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष म्हणून डिजिटल पत्रकारांच्या संघटनात्मक कार्यात योगदान देत आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक कार्यातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परिषदेच्या नूतन कार्यकारिणीत महिला, युवती, युवा, सांस्कृतिक, कार्यक्रम नियोजन, प्रकाशन, प्रसिद्धी आणि ग्रंथालय अशा विविध आयामांची निर्मिती करण्यात आली आहे. महिला आयामाच्या सहप्रमुखपदी अमृता कल्याणी, कार्यवाहपदी अक्षता केळकर, युवती आयाम प्रमुखपदी ऐश्वर्या धडके, युवा आयाम प्रमुखपदी आनंद धडके, सांस्कृतिक आयाम प्रमुखपदी प्रा. डॉ. धन्यकुमार बिराजदार, तर कार्यक्रम नियोजन आयाम प्रमुखपदी प्रा. पुरुषोत्तम बगले यांची निवड झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात परिषदेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तालुकास्तरावरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोहोळ तालुकाध्यक्षपदी विजया देशपांडे, अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी रेखा सोनकवडे, पंढरपूर तालुकाध्यक्षपदी शुभांगी दहिवाळ आणि बार्शी तालुकाध्यक्षपदी अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये साहित्यिक उपक्रमांना संघटनात्मक बळ मिळणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिकांच्या अनुभवाला नव्या पिढीच्या उत्साहाची जोड देत सोलापूर जिल्ह्यात साहित्यिक उपक्रमांना चालना देणे, नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक समरसतेचा विचार साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा परिषदेचा मानस आहे. दिनेश मडके यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील साहित्यिक आणि पत्रकारिता क्षेत्राला जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व मिळाले असून, त्यांच्या निवडीचे पत्रकार, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 3 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे