कला शाखा: उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली

कला शाखा: उज्ज्वल
भविष्याची गुरुकिल्ली
एकेकाळी ‘आर्ट्स घेऊन काय करणार?’ असा प्रश्न विचारला जायचा आणि विज्ञान व वाणिज्य शाखांनाच करिअरचे मुख्य मार्ग मानले जात होते. मात्र, २१ व्या शतकात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कला शाखा आता केवळ ज्ञानाची भूक भागवणारी किंवा विचारशक्तीला चालना देणारी शाखा राहिलेली नाही, तर करिअरच्या अनेकविध आणि अमर्याद संधींनी ती भरलेली आहे. पारंपरिक क्षेत्रातही नवनवीन बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे कला शाखेतील विद्यार्थ्यांना विविध आधुनिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रांमध्ये आपले भविष्य घडवण्याची उत्तम संधी मिळत आहे. केवळ शिक्षक किंवा प्राध्यापक होण्यापुरते मर्यादित न राहता, कला शाखेतील पदवीधर आज कॉर्पोरेट जगतापासून ते कला आणि मनोरंजनापर्यंत, प्रशासकीय सेवांपासून ते तंत्रज्ञानापर्यंत अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहेत.
शिक्षकी पेशा हा कायमच सन्मानाचा मानला जातो. B.Ed./M.Ed. करून तुम्ही शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून करिअर करू शकता. तसेच MA नंतर NET/SET/Ph.D. उत्तीर्ण होऊन महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होऊ शकता किंवा संशोधनात योगदान देऊ शकता. कायद्याचे पदवीधर (LLB) झाल्यानंतर तुम्ही न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करू शकता किंवा कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करू शकता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही थेट न्यायाधीश म्हणूनही सामील होऊ शकता. UPSC (IAS, IPS, IFS, IRS) आणि MPSC (राज्य सेवा, PSI, STI, ASO), पोलीस/मिलिटरी (CDS, SSC), रेल्वे (TTI, गुड्स गार्ड्स, स्टेशन मास्टर) यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये कला शाखेचे विषय खूप उपयुक्त ठरतात. या क्षेत्रात उच्च पदांवर काम करण्याची मोठी संधी आहे. आज बँकिंग क्षेत्रातही कला शाखेच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या, शेअर बाजार यांमध्ये तुम्ही प्रोबेशनरी ऑफिसर (PO), लिपिक (Clerk), विकास अधिकारी, विमा एजंट म्हणून करिअर करू शकता. सेवा क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी हॉटेल व्यवस्थापन एक उत्तम पर्याय आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, एअरलाईन्स, शिपिंग कंपन्या, रेल्वे, क्लब यांसारख्या ठिकाणी तुम्ही विविध पदांवर करिअर करू शकता. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनसंवाद क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वृत्तसंस्था, दूरदर्शन, वेब मीडियामध्ये तुम्ही पत्रकार, वार्ताहर, अँकर, स्तंभलेखक, रेडिओ जॉकी म्हणून काम करू शकता. क्रिएटिव्हिटी आणि कलात्मकता असणाऱ्यांसाठी हे एक आकर्षक क्षेत्र आहे. वस्त्र, दागिने, पादत्राणे, इंटिरियर डिझायनर, ब्युटी केअर (हेअर स्टायलिस्ट, ब्युटी थेरपिस्ट, मेक-अप आर्टिस्ट) म्हणून कंपन्यांमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. तसेच जाहिरात संस्थांमध्ये मॉडेलिंगच्या संधी उपलब्ध आहेत. ॲनिमेशन आणि ग्राफिक्स, डिजिटल मार्केटर, इव्हेंट मॅनेजर, विदेशी भाषा तज्ञ, कंटेंट रायटर, फिल्म मेकिंग आणि टीव्ही (अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, संपादन, छायांकन, नृत्यदिग्दर्शन, फोटोग्राफी), अभिनय आणि नाटक, नृत्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी आहेत. प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र उत्तम आहे. तुम्ही टूर आणि ट्रॅव्हल कंपन्या, एअरलाईन्स, हॉटेल्स किंवा स्वतंत्र टूर गाईड आणि ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करू शकता. समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र आदर्श आहे. तुम्ही विकास संस्था आणि स्वयंसेवी संस्था (NGOs) मध्ये काम करू शकता किंवा स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो. कला शाखेतील विद्यार्थीही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतात. BCA/MCA (संगणक ॲप्लिकेशन्स) करून संगणक ऑपरेटर, प्रोग्रामर, सॉफ्टवेअर प्रोफेशनल, वेब डिझायनर म्हणून करिअरची संधी आहे. ग्रंथपाल आणि माहिती व्यवस्थापन, GIS (भौगोलिक माहिती प्रणाली) आणि BPO/KPO मध्येही संधी उपलब्ध आहेत. विक्री आणि विपणन (Sales & Marketing), एअर होस्टेस आणि खेळ (B.P.Ed., B.Sc. Physical Education) यांसारख्या आधुनिक आणि वाढत्या क्षेत्रांमध्येही कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वरील सर्व क्षेत्रे त्यांच्या बहुपर्यायी कौशल्यांचा आणि व्यापक दृष्टिकोनाचा प्रभावी उपयोग करावा. शिक्षण आणि संशोधनात विचारशक्ती, भाषावैभव व विश्लेषण कौशल्य उपयोगी पडते. कायद्यात व प्रशासकीय सेवांमध्ये विवेकबुद्धी, मुद्देसूद मांडणी, आणि समाजाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. बँकिंग, हॉटेल व्यवस्थापन, व विपणन क्षेत्रात संवादकौशल्य आणि सेवा वृत्ती उपयुक्त ठरते. पत्रकारिता, जनसंपर्क, आणि मनोरंजन या क्षेत्रांत अभिव्यक्ती कौशल्य, कल्पकता, आणि सृजनशीलता उपयोगी ठरते. फॅशन,डिझाइनिंग व सौंदर्य क्षेत्रात कलात्मकता आणि शैलीचा भान महत्त्वाचा असतो. प्रवास-पर्यटनात भाषेचे ज्ञान, सांस्कृतिक समज, आणि व्यवस्थापन कौशल्य कामी येते. समाजकार्य आणि NGO क्षेत्रात सहानुभूती, माणुसकी व संघटनकौशल्य उपयुक्त ठरते. तंत्रज्ञान, वेब डिझाइन व GIS मध्येही आता कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे विश्लेषण कौशल्य व नवोपक्रमशीलता कामी येते. एकूणच, ही सर्व क्षेत्रे कला शाखेतील विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता साकार करण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य देतात. पण हे विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी कौशल्य अंगीकृत करणे आत्मसात करणे याकडे नको का लक्ष द्यायला ? सदगुण आणि सेवा ,कौशल्य आणि उपयोजन याकडे दुर्लक्ष नका करू. नुसते वाचन एवढेच महत्वाचे नाही, वेळ देऊन कृतीयुक्त शिक्षण घ्याल की नाही ? म्हणून शिकवणारे आणि शिकणारे यांच्या निष्ठा ,जाणीव महत्वाची ठरेल. कोणत्याही गोष्टी वरवर करणे हितकारक नाही.
विद्यार्थ्यांची आवड ओळखणे आणि त्या दिशेने प्रामाणिक, योजनाबद्ध आणि चिकाटीने वाटचाल करणे . पालकांनी आपल्या पाल्याच्या स्वभाव, कल, क्षमता आणि मूल्यांचा आदर करावा. मुलांनीही समाजाच्या मागणीनुसार नव्या कौशल्यांचा पाठपुरावा करावा…आजच्या काळात कला शाखा ही यशस्वी करिअर घडवण्याची एक अत्यंत सशक्त आणि विस्तृत वाट आहे. फक्त तुमची आवड, योग्य माहिती आणि योग्य दिशादर्शक अभ्यासक्रम यांची सांगड घालण्याची गरज आहे. बदलत्या काळात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक नव्हे, तर नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञान-आधारित क्षेत्रांमध्येही मोठी मागणी आहे. त्यामुळे, कला शाखेतील पदवीधरांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता, उपलब्ध असलेल्या या अमर्याद संधींचा शोध घ्यावा आणि त्यानुसार योग्य अभ्यासक्रम निवडून आपले भविष्य उज्ज्वल करावे.
लेखन – डॉ.सुभाष कारंडे
सहयोगी प्राध्यापक,छत्रपती
शिवाजी कॉलेज,सातारा, प्रसिद्धी सहयोग,समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111