इंडिपेंडेंस कप कराटे स्पर्धेत अहिल्यानगरच्या, मुकुंदनगर मधील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी


📰 इंडिपेंडेंस कप कराटे स्पर्धेत अहिल्यानगरच्या, मुकुंदनगर मधील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
पुण्यातील पिंपरी येथील रहाटणी परिसरात एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल येथे १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या इंडिपेंडेंस कप कराटे स्पर्धेत अहिल्यानगर (मुकुंदनगर, अहमदनगर) येथील कराटेपटूंनी आपली दमदार कामगिरी सादर करत पदकांची कमाई केली. ही स्पर्धा एस.बी.के. स्पोर्ट्स अकॅडमी व स्वरा एंटरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
या स्पर्धेत मोहम्मद अली शेख याने उत्कृष्ट कौशल्य दाखवत सुवर्ण व ग्रँड चॅम्पियन किताब पटकावला. अर्सलान अ. सय्यद याने प्रभावी कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले. तासिन तौफिक सय्यद, मुस्तफा शेख व हंझला साकिब शेख यांनी आपल्या गटात लढाऊ वृत्ती दाखवत रौप्य पदक पटकावले.
तसेच, इरम इम्रान खान, अर्शिया पठाण व सौद बशीर शेख यांनी उत्कृष्ट खेळ करत कांस्य पदक जिंकले. तर आरिझ अ. सय्यद व शेख इब्राहिम जावेद यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून चांगले प्रदर्शन केले.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी युथ कराटे अकॅडमीचे प्रशिक्षक सबिल सय्यद, साहिल सय्यद, सुजीत हजारे व ओम वाघ यांनी अथक मेहनत घेतली. युथ कराटे अकॅडमीमध्ये खेळाडू घडवण्याचे काम उत्कृष्टरित्या सुरू असल्याचे या यशातून दिसून आले.
या यशामुळे अहिल्यानगरचा कराटेविश्वात डंका पुन्हा एकदा वाजला आहे. खेळाडूंच्या मेहनतीसोबत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन हेदेखील या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले. विजेत्या सर्व खेळाडूंचे स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी व आयोजकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळात हे कराटेपटू अजून मोठी कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



