शिक्षक हे समाजाचे शिल्पकार : डॉ. उद्धव शिंदे स्नेहबंध फौंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
शिक्षक हे समाजाचे शिल्पकार : डॉ. उद्धव शिंदे
स्नेहबंध फौंडेशनतर्फे शिक्षकदिनानिमित्त शिक्षकांचा गौरव
अहिल्यानगर : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून स्नेहबंध सोशल फौंडेशन, अहिल्यानगरतर्फे स्वा. सैनिक जानकी कवडे प्रशाला येथे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षकांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि समाज घडविण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचा सन्मान करण्यासारखे आहे.”
यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. रविंद्र कवडे, संचालिका सौ. राज कवडे, मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर, दिपक पंडित, सिराज खान, गणेश कवटे, सहशिक्षिका श्रीम . उज्ज्वला घावटे, श्रीम. सुनंदा जावळे, श्रीम. स्वयंप्रभा खंडागळे, तबसुम शेख, अफ्रीन शेख यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



