धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विचारप्रबोधनपर व्याख्यान
धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विचारप्रबोधनपर व्याख्यान
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित विचारप्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार येथील प्रा. डॉ. विलास पाटील हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. जयवंत पाटील तसेच प्रा. डॉ. किशोर पाटील उपस्थित होते.
प्रा. डॉ. विलास पाटील यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेचे लोकाभिमुख स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, “शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेच्या हिताचे होते. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, तसेच समाजात कोणताही जातिभेद मान्य केला नाही.” ‘मराठा’ ही संकल्पना व्यापक असून महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण या संकल्पनेचा भाग आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले; परंतु एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव न देता लोककल्याणाचा आदर्श घालून दिला, असे त्यांनी सांगितले. समाजातील मतभेद कमी करण्यासाठी शिवविचारांचा सखोल अभ्यास आणि इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यातील समता, न्याय आणि लोकसहभाग या मूल्यांवर प्रकाश टाकला. मराठा संकल्पना ही जातीय नसून सर्वसमावेशक आहे, असे सांगत त्यांनी बारा बलुतेदारांना सोबत घेऊन उभारलेले स्वराज्य हे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. शिवाजी महाराज हे न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष आणि स्त्रीसन्मान जपणारे आदर्श राजे होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


