Breaking
ब्रेकिंग

गुरु-शिष्य परंपरेचा जागर : ज्ञानसंपदा शाळेची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

0 8 6 5 0 8

गुरु-शिष्य परंपरेचा जागर : ज्ञानसंपदा शाळेची भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर : ज्ञानसंपदा शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “गुरु-शिष्य परंपरा” या संकल्पनेवर आधारित भव्य शोभायात्रा रविवार दिनांक 26 जुलै रोजी मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. भारतीय संस्कृती, अध्यात्म, पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती, स्वच्छता आणि योगाचे महत्त्व यांचा प्रभावी संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला.
शोभायात्रेचे उद्घाटन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर मा. ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. गंगा उद्यान येथून प्रारंभ झालेली शोभायात्रा आकाशवाणी, प्रोफेसर चौक, कुष्टधाम रोड, भिस्तबाग चौक मार्गे भिस्तबाग महाल येथे पोहोचली. समारोप प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक ‘पसायदान’ सादर केले.
शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुरु-शिष्य परंपरेवर आधारित विविध देखावे व रथ. ब्रह्मा-विष्णू-महेश, सप्तऋषी, श्रीराम–वशिष्ठ, संत ज्ञानेश्वर–निवृत्तीनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, श्रीकृष्ण–सांदीपनी, रामकृष्ण परमहंस–स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी देखावे, तसेच योगासनाचे महत्त्व नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. तसेच राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या खेळाडूंचा गौरव करणारा रथही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक व सांस्कृतिक नृत्य, लेझीम, झांज पथक, स्वसंरक्षणासाठी लाठी-काठी प्रात्यक्षिके, योगासनांचे सादरीकरण, वारकरी वेशभूषा, बैलगाडी रथ, विठ्ठल-रुक्मिणी पालखी, ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी आदी माध्यमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि स्वच्छतेचा प्रभावी संदेशही यावेळी देण्यात आला.
या शोभायात्रेला पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यासाठी पोलीस विभाग तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीणजी बजाज, उपाध्यक्ष मिलिंदजी गंधे, स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी भिंगारे, मानद सचिव अरुणजी कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, विश्वस्त श्रीहरी टिपूगडे, विनोद बजाज, शरदजी कुलकर्णी, सुहास मुळे, दिनेश अग्रवाल, सुमित सोनवणे, वरूण भगत, अक्षय वाघमोडे, डायरेक्टर डॉ. सुनिता भागवत,अमित सोनवणे, रोहन बजाज, सुहास भिंगारे, गौरव गंधे, गौतम गंधे अमेय कुलकर्णी,अनिरुद्ध बोपर्डीकर, प्रितेश बजाज, निनाद टिपुगडे, परिवारासह उपस्थित होते. तसेच भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते, विचार भारती मंचचे रवींद्र मुळे आणि जडणघडण मासिकाचे संपादक व ज्येष्ठ व्याख्याते डॉ. सागर देशपांडे, श्री महेंद्र गंधे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, यांनी शोभायात्रेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर यांच्या उत्तम मार्गदर्शनाने तसेच कैलास जाधव (मराठी-हिंदी विभाग) यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वी पार पडला. तसेच ज्ञानसंपदा शाळेचे सर्व उपक्रमशील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
भारतीय संस्कृती, गुरु-शिष्य परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन करणारी ही शोभायात्रा नागरिकांच्या मनावर कायमची छाप उमटवून गेली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे