केम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा

केम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०३/ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या करमाळा, साडे उपखंडातील केम मंडलाच्या वतीने रविवार, १ नोव्हेंबर रोजी विजयादशमी उत्सव, शस्त्रपूजन आणि पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी स्वयंसेवकांनी केम गावातून शिस्तबद्ध पथसंचलन केले. गणवेशातील स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर संचलन करत नागरिकांचे लक्ष वेधले. नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.
कार्यक्रमास करमाळा तालुका संघचालक डॉ. श्रीराम धोंडनसिंह परदेशी आणि प्रमुख पाहुणे विजयकुमार छगनलाल बलदोटा उपस्थित होते. प्रमुख वक्ते संग्राम संजय दयाळ यांनी संघाच्या पंचपरिवर्तन उपक्रमाची माहिती दिली. पर्यावरणसंवर्धन, पाणीबचत, कुटुंबप्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशीचा स्वीकार आणि नागरिकांचे कर्तव्य या विषयांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमादरम्यान शस्त्रपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास स्वयंसेवक, पदाधिकारी, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



