नेवासा तालुक्यातील सुदामपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
नेवासा तालुक्यातील सुदामपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
” सती, संत आणि शूरवीर हे देशाला सजवतात. ज्या देशात या तीन गोष्टी नसतील तर त्या देशाकडे अणुबॉम्ब असले तरी त्या देशाचा विनाशच होणार हे लक्षात घ्यावे. आपल्या भारत देशामध्ये सतींची म्हणजे पतिव्रतांची खाण आहे. प्रत्येक जातीत संत झाले आहेत. आपला भारत देश शूर वीरांचा देश आहे.” असे प्रतिपादन खोकर येथील गोरक्षनाथ मठाचे महंत सेवानाथ महाराज यांनी केले. नेवासा तालुक्यातील सुदामपूर येथे हनुमान मंदिरात तरुण कीर्तनकार हभप अशोक महाराज कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह चालू असून ही भक्तीची परंपरा सुदामपुरातील ज्येष्ठ भागवत भक्तांनी पन्नास वर्षांपासून अखंड चालू ठेवली आहे.
सेवानाथ महाराज पुढे म्हणाले, ” कपटी, कायर आणि क्रूर माणसे आपल्या देशात असता कामा नयेत. आपल्या देशात अत्याचार , अनाचार , भ्रष्टाचार होता कामा नये. आपल्या गावात चहाडी, चोरी आणि शिंदळकी या तीन गोष्टी नकोत. नाहीतर आपल्या गावाचा विकास होणार नाही. आपल्या घरात आळस भांडण आणि व्यसन या तीन गोष्टी नकोत. त्यांच्यामुळे घराची प्रगती होत नाही. जो कामात व्यस्त , त्याचाच प्रपंच मस्त हे लक्षात ठेवा. तरच तुमच्या घरात लक्ष्मी आणि सौख्य नांदेल. आपल्या शरीरात काम , क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी असता कामा नयेत. काम पूर्तता झाली नाही तर क्रोध आणि लोभ येतात . काम क्रोधामुळे विश्वामित्रांची 60000 वर्षांची तपश्चर्या वाया गेली. फक्त भगवंताचे नामच आपल्याला काम क्रोध लोभांपासून मुक्ती देऊ शकतात. “
पाप ताप दैन्य जाय उठाउठी l
जाहलीया भेटी हरिदासाची ll
ऐसे बळ नाही आणिकांचे अंगी l
तप तीर्थ जगी दान व्रत ll
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर सेवानाथ महाराज निरूपण करीत होते. त्यांनी पुढे असेही सांगितले की आपल्या मनात असत्य , अविद्या आणि अविचार नकोत. जीवनात पाप , ताप , दैन्य नको . आपल्या मनात पाप असेल तर दैन्य येणारच .आपल्या जीवनात दुःख आले तर समजावे आपले पाप कमी होत आहे.
गंगा पापम् शशि तापं दैन्यम् कल्पतरू l
कल्पतरू माणसाची इच्छा पूर्ण करतात पण ती इच्छा पूर्ण करताना कल्याणाचा विचार करीत नाही. चारीधाम यात्रा केली तरी तुमचे पाप नष्ट होणार नाही. कितीही तप केले तरी आपले पाप नष्ट होणार नाही . पुण्य उघड केले तर ते संपून जाते पण पाप उघड केले तर आपण पाप मुक्त होतो. एकादशी आणि सोमवार यांचे सारखे दुसरे उत्तम व्रत नाही. हे व्रत अलौकिक फळ देते. भगवंताला आपल्या प्राणापेक्षा भक्त प्रिय आहेत. त्यांचे म्हणजे भगवंताच्या भक्तांचे सोहळे जो करतो, त्यालाच भगवंत तारुन नेतो.
या प्रसंगी हभप शिवाजी महाराज बिरदवडे, हभप संभाजी महाराज कोठुळे, हभप राजेंद्र आसने महाराज, भास्करराव देशमुख, अनिल देशमुख,खाटीक पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.



