गुंडेगाव ग्रामसभा कोरम अभावी अखेर तहकूब ; ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठी अनुपस्थिती.
सोशल मिडियावर विकासाची चर्चा मात्र प्रत्येक्षात ग्रामसभेला गैरहजर...*
*गुंडेगाव ग्रामसभा कोरम अभावी अखेर तहकूब ; ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठी अनुपस्थिती..*
*सोशल मिडियावर विकासाची चर्चा मात्र प्रत्येक्षात ग्रामसभेला गैरहजर…*
*आरोग्य,पशुवैद्यकीय, अंगणवाडी सेविका सोडता इतरांनी फिरवली पाठ..
वाळकी / प्रतिनिधी :- दादा आगळे
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बुधवार दि.२६ रोजी बोलावलेली ग्रामसभा कोरम अभावी तहकूब केली.गावातील रस्ते,वीज, आरोग्य, स्वच्छता प्रश्न ऐरणीवर आहे. ग्रामसभेत या विषयांवर चर्चा होणे आवश्यक असताना ग्रामस्थांनी मात्र ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक माणिकराव होनकर्पे यांनी दिली.
गुंडेगावच्या महिला सरपंच मंगल सकट यांच्या अध्यक्षतेखाली होणारी “ग्रामसभा” अखेर कोरम अभावी “तहकूब” झाली असली तरी यामधून सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्यात विकास कामांवरुन मोठी नाराजी व अविश्वास असल्याचे दिसून आले आहे.गावाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ग्रामसभेची असते.लोकशाहीचे बलस्थान व गावाचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा मानले जाते. विकासकामांचा आढावा घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेचे आयोजन केले जाते.यामध्ये गावच्या सार्वजनिक विषयावर चर्चा होऊन अनेक समाजहिताचे उपक्रम राबविले जातात. परंतु ही ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब झाल्याचे चित्र गुंडेगावात पाहायला मिळाले. यावेळी गावातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनीही या ग्रामसभेला पाठ फिरवल्याचे दिसून आले.यावेळी आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका सोडता इतर कर्मचारी हे गैरहजर होते.यावर ग्रामपंचायत काय कारवाई करणार हे महत्त्वाचे आहे.ग्रामसभेविषयी जनजागृती करण्यास गाव अपयशी ठरताना दिसत आहेत का ? गावागावांतील वेगवेगळे गट, मतप्रवाह यामुळे ग्रामसभा होत नाही का?ग्रामसभेत भांडणाचे प्रकार घडतात म्हणून ग्रामसभा होत नाही?लोकशाही प्रकियेत ग्रामसभा महत्त्वाची भूमिका असली तरी प्रत्यक्षात गाव कारभारात ग्रामसभेचा प्रभाव जाणवताना दिसत नाही.असाच सार्वत्रिक अनुभव गुंडेगावात आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये सरपंच मंगल
सकट,उपसरपंच नानासाहेब हराळ, भाऊसाहेब हराळ, संतोष धावडे, सुनिल भापकर, ग्रामपंचायत कर्मचारी शहाजी भापकर, अमोल गाढे, वैशाली देशमुख सह चार पाच सदस्य सोडता एकूण ३१ ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते.



