जे. एस. एम. महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे आयोजन
जे. एस. एम. महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे आयोजन
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व मुंबई विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली जे. एस. एम. महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी दि. ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी ‘वाचन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने जे. एस. एम. महाविद्यालयाच्या ‘ग्रंथालय व माहिती स्त्रोत केंद्र’ व ‘मराठी भाषा-वाडमय अभ्यास मंडळा’तर्फे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मा. अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष, जनता शिक्षण मंडळ, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. सोनाली पाटील, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल प्रा. सुबोध डहाके, ग्रंथालय समिती प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे उपस्थित होते. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांचे सामूहिक वाचन केले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रमिक पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके, ग्रंथ, नियतकालिके यांच्या वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी व वाचन कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी केले. सोशल मिडीयाच्या वाढत्या आकर्षणामुळे अत्यंत कमी झालेली वाचनाची आवड विद्यार्थ्यांनी पारंपरिक व आधुनिक माध्यमांचा वापर करून वृद्धिंगत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी यासाठी ‘वाचन संकल्प पंधरवड्या’निमित्त ग्रंथप्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, सामूहिक वाचन, महाविद्यालयाच्या ग्रंथालयास व सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, अलिबाग येथे भेट, पुस्तक परीक्षण लेखन व पुस्तक परीक्षण कथन अशा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा व उपक्रम यातील यशस्वी विद्यार्थ्यांना दि. २६ जानेवारी २०२५ रोVजी पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागासाठीचे ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.