बोर्डाच्या कामात प्रशासकीय अडथळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा अकोल्यात संताप
शिक्षक भारतीचा 'आक्रोश' आंदोलनाचा इशारा; प्रशासकीय प्रोटोकॉल पायदळी तुडवल्याचा आरोप
बोर्डाच्या कामात प्रशासकीय अडथळा; कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा अकोल्यात संताप
शिक्षक भारतीचा ‘आक्रोश’ आंदोलनाचा इशारा; प्रशासकीय प्रोटोकॉल पायदळी तुडवल्याचा आरोप
राहुरी तालुका जावेद शेख
शिक्षण विभागात प्रशासकीय शिष्टाचाराचा (Protocol) फज्जा उडाला असून, अकोले पंचायत समितीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना (Class-II) पदवीधर शिक्षकांच्या हाताखाली ‘पर्यवेक्षक’ म्हणून नियुक्त करण्याचे आदेश काढल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या अपमानस्पद वागणुकीविरोधात आणि शालाबाह्य कामांच्या सक्तीविरोधात ‘शिक्षक भारती’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मागणी मान्य न झाल्यास थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ‘तीव्र आक्रोश आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.
नेमका वाद काय?
अकोले गटशिक्षणाधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र (जा.क्र./SSA/680/2026) काढून २२ फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ‘पर्यवेक्षक’ म्हणून नियुक्त केले आहे. मुळात, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हे ‘वर्ग-२’ दर्जाचे अधिकारी असताना, केंद्रसंचालक म्हणून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ श्रेणीतील पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ श्रेणीतील शिक्षकांना कनिष्ठ कामाची सक्ती करणे हा प्रशासकीय दर्जाचा अवमान असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बोर्डाच्या कामात मिठाचा खडा!
सध्या इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, पेपर तपासणी (Moderation), पर्यावरण प्रकल्प मूल्यांकन आणि ऑनलाईन गुण भरण्याचे अत्यंत संवेदनशील व गोपनीय काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना शिष्यवृत्तीच्या कामात जुंपल्यास बोर्डाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तरीही प्रशासन या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप पुणे विभाग कार्याध्यक्ष व अहिल्यानगर सेक्रेटरी प्रा. महेश पाडेकर यांनी केला आहे.
शिक्षक भारतीच्या प्रमुख मागण्या:
तातडीने कार्यमुक्त करा: २२ फेब्रुवारीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कामातून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना तात्काळ वगळावे.
प्रोटोकॉल पाळा: भविष्यात शिक्षकांना त्यांच्या ‘क्लास-२’ दर्जाला साजेसे काम द्यावे.
शालाबाह्य कामे बंद करा: शैक्षणिक संहितेचे उल्लंघन करून दिली जाणारी शालाबाह्य कामे कायमस्वरूपी थांबवावीत. यावेळी पंचायत समिती अकोले येथे शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात कनिष्ठ सहायक काटकर मॅडम यांना निवेदन दिले यावेळी शिक्षक भारती संघटना अकोले तालुकाध्यक्ष संपत वाळके,जिल्हा संघटक सोमनाथ बोणतले,कोषाध्यक्ष गोपाळ दराडे,मार्गदर्शक पंडित देशमुख, संदीप भोर,भागवत,सोपान कोरडे,शिवाजी बुरके, मुख्याध्यापक रावसाहेब वावळे,नरेश खाडगीर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
”जर प्रशासनाने हा आडमुठेपणा सोडला नाही आणि हे अपमानस्पद आदेश मागे घेतले नाहीत, तर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पंचायत समिती अकोले येथे ‘आक्रोश आंदोलन’ छेडले जाईल. यातून होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील.”
— प्रा.महेश पाडेकर कार्याध्यक्ष शिक्षक भारती, पुणे विभाग व सेक्रेटरी अहिल्यानगर जिल्हा युनिट


