दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १४/ दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी आक्रमकपणे पाठपुरावा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे २०२६-२७ मधील मंजूर ०.५७ टीएमसी पाणी कायम ठेवून १५ डिसेंबरऐवजी १५ नोव्हेंबर २०२६ पासून सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.
उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी धरणातील एकूण ३७.३९ टीएमसी पाण्याच्या वितरणाचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १५ डिसेंबर २०२६ ते १० फेब्रुवारी २०२७ या कालावधीत ०.५७ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, दहिगाव उपसा सिंचन योजना दोन टप्प्यांत कार्यरत असून, उजनी धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर जुने पंप असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी होतो. पुढील काळात धरणातील पाणीसाठा उणे पातळीकडे जाण्याची शक्यता लक्षात घेता मंजूर पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आवर्तनाची तारीख बदलणे आवश्यक असल्याचे संजयमामा शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, घोटी, निंभोरे, फिसरे, सरपडोह, पांडे, शेलगाव (क) आदी गावांमध्ये सध्या टँकरद्वारे केवळ मनुष्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जात आहे. आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत १५ नोव्हेंबरपासून आवर्तन सुरू झाल्यास संबंधित गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
मंजूर आवर्तनाच्या तारखेत बदल करून १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात यावे, अशी भूमिका संजयमामा शिंदे यांनी मांडली आहे. योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने तपासणी करून कालवा सल्लागार समितीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी संजयमामा शिंदे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्याने आता शासन आणि प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण लाभक्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



