जलसंधारणातून गावविकासाचा ‘हिवरेबाजार पॅटर्न’ जाणून घेतला
पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून डॉ. उद्धव शिंदे यांनी घेतले मार्गदर्शन

जलसंधारणातून गावविकासाचा ‘हिवरेबाजार पॅटर्न’ जाणून घेतला
पद्मश्री पोपटराव पवार यांच्याकडून डॉ. उद्धव शिंदे यांनी घेतले मार्गदर्शन
अहिल्यानगर – एकेकाळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या हिवरेबाजारने जलसंधारण, काटेकोर नियोजन आणि ग्रामएकजुटीच्या बळावर आदर्श गाव म्हणून देशभरात ओळख निर्माण केली आहे. या गावाच्या सर्वांगीण विकास मॉडेलची पाहणी करण्यासाठी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आदर्शगाव हिवरेबाजारला भेट दिली. यावेळी त्यांनी पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेऊन त्यांना पुस्तक भेट दिले.
या भेटीदरम्यान पवार यांनी हिवरेबाजारच्या विकासाची वाटचाल आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जलसंधारणासोबतच पाण्याचे ऑडिट, उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि दुष्काळी परिस्थितीत पाण्याची बचत करून भूजलपातळी वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांवर त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. बांधबांधणी, दारूबंदी, नशाबंदी आणि सामूहिक वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचे योग्य नियोजन केले, तर दुष्काळी परिस्थितीतही गावाचा शाश्वत विकास साधता येतो, हे हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. गावाच्या विकासाचे हे मॉडेल अभ्यासण्यासाठी देशभरातून अनेकजण येथे येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
हिवरेबाजार हे जलसंधारण, शिस्तबद्ध नियोजन आणि ग्रामएकजुटीच्या बळावर उभे राहिलेले आदर्श मॉडेल आहे. येथील अनुभव इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले.
यावेळी राम आकसाळ व सतीश गाडेकर उपस्थित होते.
फोटो ओळ :
आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेऊन त्यांना पुस्तक भेट देताना डॉ. उद्धव शिंदे. समवेत राम आकसाळ व सतीश गाडेकर.


