अनिल पाटलांना मंत्रिपदाचा लाभ होणार ? ; मंत्रिमंडळात समावेश झाल्यास जळगाव जिल्ह्यास लाभणार चार कॅबिनेट मंत्री
अनिल पाटलांना मंत्रिपदाचा लाभ होणार ? ; मंत्रिमंडळात समावेश झाल्यास जळगाव जिल्ह्यास लाभणार चार कॅबिनेट मंत्री
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात ऑनलाईन रमी खेळत असल्याच्या आरोपामुळे वादात अडकले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांना अभय देवून त्यांच्याकडील कृषीमंत्रीपद काढून अमळनेर येथील पक्षाचे आमदार अनिल पाटील यांच्याकडे देणार असल्याचे वृत्त आहे.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधी पक्षानी जोरदार आवाज उठविला आहे.
त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात येत आहेत. याच वादात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकरणी पक्षाचे विधीमंडळ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असे जाहीर केले आहे. त्यामुळे अजित पवार माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करणार हे निश्चित दिसत आहे. परंतु त्यांना थेट मंत्री मंडळातून डच्चू देण्याऐवजी त्यांच्याकडे मदत व पुनवर्सन मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कृषीमंत्रीपद हे अमळनेर येथील माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. गेल्यावेळी युती शासनात अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुर्नवसन मंत्रीपद होते. मात्र यावेळी निवडणूका झाल्यावर पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु त्यांना मंत्रीमंडळात संधी देण्यात आली नाही.
माणिकराव कोकाटे वादग्रस्त ठरल्याने आमदार अनिल पाटील यांची मंत्रीमंडळात समर्थकांनी ठेवले स्टेटस .आमदार अनिल पाटील यांना कृषीमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे त्यांच्या समर्थकांत आनंद व्यक्त होत आहे. अनेक समर्थकांनी त्यांच्या मोबाईल स्टेटसवर आ. अनिल पाटील यांचे फोटो ठेवले असून, ‘आमचा आमदार मंत्री होणार’ असेही काहींनी आपल्या स्टेटवर लिहीले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार हे याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवार (ता. २६) रोजी माणिकराव कोकाटे कृषीमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून त्याच दिवशी अनील पाटील यांचा मंत्रीमंडळात सामावेश होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यांचा मंत्रीमंडळात सामावेश झाल्यास जळगाव जिल्ह्याला चौथा मंत्री मिळणार आहे.



