सोलापूर-विजापूर महामार्गावर भीषण अपघात: महिला जागीच ठार, गंभीर जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून शंभूराजे जगताप यांनी दाखवला माणुसकीचा प्रत्यय

सोलापूर-विजापूर महामार्गावर भीषण अपघात: महिला जागीच ठार, गंभीर जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून शंभूराजे जगताप यांनी दाखवला माणुसकीचा प्रत्यय
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ०३/सोलापूर – विजापूर राष्ट्रीय महामार्गावर १ ऑक्टोबर रोजी काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात घडला. एका भरधाव वाहनाने दुचाकीला/पादचाऱ्यांना चिरडल्याने महिलेचा जागीच छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृत्यू झाला, तर एक पुरुष अत्यंत गंभीर जखमी झाला. शेकडो लोक केवळ मूकदर्शक बनून उभे असताना, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी दाखवलेली समयसूचकता, धाडस आणि संवेदनशीलता यामुळे गंभीर जखमी व्यक्तीला वेळेत वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचू शकले.
रस्त्यावर बॅग दिसली अन् संशय बळावला:-
१ ऑक्टोबर २०२६ रोजी शंभूराजे जगताप हे सहकाऱ्यांसमवेत एका नियोजित प्रदर्शनासाठी बंगळुरूच्या दिशेने निघाले होते. महामार्गावरून प्रवास करत असताना रस्त्यावर एक ट्रॅव्हलिंग बॅग आणि वाहनाची संशयास्पद हालचाल त्यांच्या निदर्शनास आली. काहीतरी अनुचित घडल्याची शंका येताच त्यांनी कसलाही विलंब न करता गाडी मागे वळवली. घटनास्थळी पोहोचताच समोरचे दृश्य पाहून अंगावर काटा आला. अपघातात एका महिलेचा डोक्याचा संपूर्ण भाग चिरडला गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला होता, तर एक पुरुष जड वाहनाच्या चाकाखाली अत्यंत क्रूरपणे अडकलेला होता.
स्वतः ट्रक चालवून जखमीला बाहेर काढले:-
अपघाताचे भीषण वास्तव पाहून रस्त्यावर शेकडो लोकांची गर्दी जमली होती मात्र, पोलीस तपास आणि कोर्ट-कचेरीच्या भीतीने कोणीही पुढे येण्याचे धाडस करत नव्हते. अशा अत्यंत नाजूक क्षणी शंभूराजे जगताप यांनी क्षणाचाही विचार न करता मदतीसाठी झेप घेतली. चाकाखाली अडकलेल्या जखमीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतः ट्रकमध्ये बसून वाहन अत्यंत काळजीपूर्वक नियंत्रित केले आणि अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली.
जखमी व्यक्तीची अवस्था अत्यंत विदारक होती:-
त्याच्या हाताचा भाग पूर्णपणे निकामी झाला होता, तर दोन्ही पाय मांडीतून गंभीररीत्या तुटून पॅन्टमध्येच लोंबकळत होते. कायमस्वरूपी अपंगत्वाच्या उंबरठ्यावर उभा असलेला तो कन्नड भाषेत आक्रोश करत म्हणाला, “मला सोडून जाऊ नका, नाहीतर मी मरेन…” या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
भाषेची अडचण ओलांडून तातडीने यंत्रणा हलवली:-
कर्नाटक हद्दीत हा अपघात झाल्याने संवादाची अडचण येत होती. तरीही शंभूराजे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने समन्वय साधत तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले. महामार्गावर पुन्हा अपघात घडू नये व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्यांनी वाहनातील ‘हझार्ड इंडिकेटर’ व सुरक्षा फलक रस्त्यावर लावून वाहतूक सुरळीत ठेवली. काही वेळातच रुग्णवाहिका दाखल होऊन गंभीर जखमीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या प्रसंगाबद्दल बोलताना शंभूराजे जगताप अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले की कदाचित देवाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली असावी”. “अपघाताचे ते दृश्य मनाला चटका लावणारे होते. त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी मी धडपडलो, पण त्याचे पाय आणि हाताची झालेली दुर्दशा पाहून मन सुन्न झाले. जेव्हा तो मला सोडून न जाण्याची विनवणी करत होता, तेव्हा माणुसकी म्हणून तिथे थांबणे हेच माझे कर्तव्य होते. यापूर्वीही अशा अनेक अपघातांमध्ये योगायोगाने मी वेळेवर पोहोचलो आणि लोकांचे प्राण वाचले. कदाचित अशा संकटात सापडलेल्या जीवांना मदत करण्याची जबाबदारी देवानेच माझ्यावर सोपवली आहे. मी लोकांना कळकळीची विनंती करतो की, कायदेशीर गोष्टींना न घाबरता संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी पुढे या.”
कोणत्याही राजकीय सीमा किंवा प्रांताच्या पलीकडे जाऊन शंभूराजे जगताप यांनी दाखवलेली ही माणुसकी सध्या महामार्गावरील प्रवाशांमध्ये आणि दोन्ही राज्यांतील नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे.


