पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावित्रीबाई फुले विद्यालयाचे लोकनृत्य जिल्ह्यात प्रथम ; राज्यस्तरावर झेप!

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावित्रीबाई फुले विद्यालयाचे लोकनृत्य जिल्ह्यात प्रथम ; राज्यस्तरावर झेप!
लोकनृत्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
राहुरी तालुका जावेद शेख
राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प योजनेंतर्गत भूमिका अभिनय व लोकनृत्य जिल्हास्तरीय स्पर्धेचे नुकतेच चंदनापुरी, ता. संगमनेर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध खाजगी अनुदानित, शासकीय व आश्रमशाळांनी सहभाग नोंदविला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लोकनृत्य प्रकारात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या लोकनृत्य संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लोकनृत्य स्पर्धेसाठी विविध सामाजिक विषय देण्यात आले होते. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय निवडून प्रभावी व आकर्षक लोकनृत्य सादर केले. नृत्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. आशयपूर्ण मांडणी, प्रभावी सादरीकरण आणि लोककलेचा सुंदर आविष्कार यामुळे विद्यालयाच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
या यशासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे व पर्यवेक्षक मनोज बावा , प्रा. जितेंद्र मेटकर यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
लोकनृत्य स्पर्धेत राजेश्वरी जाधव, प्रज्ञा साळवे, जास्मिन पठाण, प्रांजल बोर्डे व अक्षदा ओहोळ या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांना अनघा सासवडकर, वैजयंती बुऱ्हाडे, योगिता कुताळ व ऋतुजा चव्हाण या मार्गदर्शक शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू तथा अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, सभापती डॉ. साताप्पा खरबडे व खजिनदार महेश घाडगे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांतील लौकिकात आणखी भर पडली आहे.फोटो कॅप्शन :
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षिका.


